निर्देशांकात एक टक्क्यांनी वाढ, बाजारमूल्य २२ लाख कोटींनी वाढले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अमेरिकी फेडरल रिझर्व्हने या वर्षी दोन वेळा व्याजदर कपात करण्याची शक्यता वर्तवल्याने, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदीस सुरुवात केल्याने आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे शेअर बाजारात पुन्हा तेजी परतली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी शुक्रवारी जवळपास एक टक्का वाढले, त्यामुळे बाजारमूल्य २२.१२ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी केलेल्या विविध घोषणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे बाजार गडगडला होता. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या शेअर्सच्या किंमती घसरल्या होत्या. मात्र, अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीची शक्यता वर्तवल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात पुन्हा गुंतवणूक करायला सुरुवात केली.
गुरुवारी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३,२३९ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी सातत्याने बाजारात पुनरागमन केल्याने, गुंतवणूकदारांनी नकारात्मक जागतिक बाजारभावनांकडे दुर्लक्ष करत खरेदीवर भर दिला. त्यामुळे शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. बाजार भांडवल पाच दिवसांत २२ लाख १२ हजार १९१ कोटी रुपयांनी वाढले आहे.
या आठवड्यात सेन्सेक्स ३,०७६ अंशांनी, तर निफ्टी ९५३.२ अंशांनी वाढला आहे. शुक्रवारी २,८२३ शेअर्स वधारले, तर १,२१३ शेअर्समध्ये घसरण झाली. परिणामी, निफ्टीने २३,४०० अंशांचा टप्पा ओलांडला आहे.
देशांतर्गत शेअर बाजारातील वाढ आणि नवीन परदेशी भांडवलाच्या प्रवाहामुळे रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत वाढ नोंदवली. रुपया, डॉलरच्या तुलनेत ३६ पैशांनी वाढून ८६ रुपयांवर बंद झाला. देशाचा परकीय चलनसाठाही या आठवड्यात ३०.५ कोटी अमेरिकी डॉलरने वाढून ६५४.२७१ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. ही गेल्या दोन वर्षांतील सर्वात मोठी साप्ताहिक वाढ आहे.
