परवानगीशिवाय ड्रोन वापरल्यास दंडनीय कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही खाजगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) किंवा छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना संबंधित पोलीस ठाण्याला किमान ७ दिवस आधी पूर्वसूचना देऊन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, तसेच केंद्रीय संस्था असून, दहशतवादी कारवायांसाठी ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी केली जाऊन त्याचा वापर अतिरेकी कारवायांसाठी केला जाऊ शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही.
दौंड, बारामती, शिरूर तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, वाळू माफिया देखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करत असल्याची शक्यता आहे. ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी करून इतर प्रकारच्या चोऱ्याही होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील. तसेच, या आदेशाचा भंग करून पोलिसांची परवानगी न घेता कोणीही ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करताना आढळल्यास, संबंधित व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम २३३ नुसार दंडनीय कारवाईस पात्र ठरेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
