दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात काठीने मारले, चुलीच्या लाकडांना लावली आग
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घर विकू नये म्हणून घर खरेदीची कागदपत्रे न दिल्याने, दारूच्या नशेत वृद्ध पतीने पत्नीच्या डोक्यात काठी मारून तिला जखमी केले. त्यानंतर चुलीसाठी जमा केलेली घरातील लाकडे पेटवून दिली. मात्र, शेजाऱ्यांनी वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला.
या प्रकरणी इंदुबाई विलास गायकवाड (वय ५०, रा. ओटा स्कीम, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विलास महादेव गायकवाड (वय ६५, रा. ओटा स्कीम, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या पती, दोन मुले आणि नात यांच्यासह एकत्र राहतात. विलास गायकवाड हे महापालिकेच्या महावितरण विभागात काम करत होते. ते निवृत्त झाले असून त्यांना दारू पिण्याचे व्यसन आहे. दारूच्या नशेत ते घरी येऊन शिवीगाळ करतात.
१५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता विलास गायकवाड दारू पिऊन घरी आले. त्यांनी राहते घर विकण्यासाठी पत्नीला घराच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र, फिर्यादींना घर विकायचे नसल्याने त्यांनी कागदपत्रे देण्यास नकार दिला.
त्यावर संतापून विलास गायकवाड यांनी जवळच पडलेली लाकडी काठी उचलून पत्नीच्या डोक्यात मारली, त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. यावेळी, त्यांची नात प्रियंका त्यांना घेऊन पोलीस चौकीत आली.
पोलिसांनी उपचारासाठी तक्रार नोंदवली. दरम्यान, विलास गायकवाड यांनी दारूच्या नशेत घरातील चूल पेटवण्यासाठी जमा केलेली लाकडे जाळून टाकली. त्यामुळे फिर्यादी घरी धावत आल्या. तोपर्यंत लोकांनी आग विझवली होती.
पोलिसांकडे तक्रार दिल्यास पतीची पेन्शन बंद होईल, या भीतीने फिर्यादींनी आजवर तक्रार दिली नव्हती. मात्र, अखेर त्यांनी हिम्मत करून पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कामथे करत आहेत.
