शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४५ लाखांची फसवणूक
खराडी, हडपसरमधील तरुणांना गंडा घातला : शेअर बाजार फसवणुकीत वाढती प्रवृत्ती
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची एकूण ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
खराडी भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ३६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत संबंधित तरुणाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखवले. त्यानंतर, तरुणाला सोशल मीडियावरील एका समूहात सहभागी करून घेतले आणि गुंतवणूक योजनांची माहिती दिली.
तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. मात्र, पैसे भरल्यानंतर त्याला सुरुवातीला परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत. हडपसर भागातील एका तरुणाचीही शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी आठ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केली.
यासंदर्भात त्याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने करत आहेत. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची माहिती अद्ययावत (अपडेट) करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची ३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली.
याबाबत संबंधित तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तो एका खासगी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतो. चोरट्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून बँकेकडून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची माहिती संकलित करून ती अद्ययावत केली जात असल्याचा दावा केला.
त्यानंतर, तरुणाकडून बँक खात्याची गोपनीय माहिती आणि क्रेडिट कार्डचा सांकेतिक शब्द (OTP) मिळवला. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी त्याच्या खात्यातून ३ लाख ८० हजार रुपये स्वतःच्या खात्यात हस्तांतरित केले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत.
