आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ज्येष्ठ नागरिकांच्या फ्लॅटमध्ये चोरी करणारे अल्पवयीन ताब्यात

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, People, Social • March 26, 2025
Spread the love

पुणे : कोथरूड भागातील हॅपी कॉलनीमधील ज्येष्ठ नागरिकांच्या फ्लॅटमधून साडेपाच लाखांचे दागिने चोरून पसार झालेल्या अल्पवयीनांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून साडेपाच लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. हे दोघे अल्पवयीन सराईत गुन्हेगार आहेत.

कोथरूडमधील हॅपी कॉलनीत राहणारे ज्येष्ठ नागरिक ७ मार्च रोजी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील १४४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड चोरली होती. तपास पथकाने या घरफोडीचा तपास सुरू केला.

यासाठी परिसरातील २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावरून पोलिसांनी या अल्पवयीन चोरट्यांचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४९ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले.

चौकशीत एका अल्पवयीनाच्या भावाकडे उर्वरित दागिने असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने हडपसर भागातून पृथ्वीराज ऊर्फ साहिल संतोष आबाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून साडेपाच लाख रुपये किमतीचे ६९ ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले. चोरीला गेलेल्या १४४ ग्रॅम दागिन्यांपैकी ११८ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी पाटील, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर, पोलीस अंमलदार धीरज पवार, सोमेश्वर यादव, शशिकांत सपकाळ, अतुल क्षीरसागर, शिवाजी शिंदे, अंकुश लोंढे, साईनाथ पाटील, नवनाथ आटोळे, माधुरी कुंभार आणि सोनल म्हसकुले यांनी केली आहे.