खडकी पोलिसांनी आयबीच्या मदतीने वेशांतर करून पकडले, २२ जिवंत काडतुसे जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खडकी येथील अॅम्युनेशन फॅक्टरीमधून २२ जिवंत काडतुसे चोरून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्या कर्मचार्याला इंटेलिजन्स ब्युरो (आय बी) आणि खडकी पोलिसांच्या मदतीने अॅम्युनेशन फॅक्टरीच्या पथकाने पकडले. खडकी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
गणेश वसंतराव बोरुडे (वय ३९, रा. कल्पतरू सोसायटी, खराडी रोड, चंदननगर) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचार्याचे नाव आहे. याबाबत फॅक्टरीतील कनिष्ठ अभियंता जयेंद्र कस्तुरी यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता अॅम्युनेशन फॅक्टरीच्या गेट क्रमांक १२ जवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कनिष्ठ कार्यकारी अभियंता म्हणून काम करतात. त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुप्त कारवाईबाबत माहिती दिली. त्यानुसार, आय बी आणि खडकी पोलिसांच्या मदतीने फॅक्टरीच्या गेट क्रमांक १२ येथे सापळा रचण्यात आला.
गणेश बोरुडे हा जिवंत काडतुसे चोरून बाहेर नेत असल्याची माहिती मिळाल्याने अधिकाऱ्यांनी वेशांतर करून पाळत ठेवली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बोरुडे गेटजवळ पोहोचताच त्याला घेरून जागीच पकडण्यात आले. त्याच्या होंडा अॅक्टीव्हा दुचाकीची झडती घेतली असता २२ जिवंत काडतुसे सापडली.
प्राथमिक तपासात, आरोपी फॅक्टरीत काम करत असताना परवान्याशिवाय जिवंत काडतुसे चोरून बाहेर नेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी त्याने अशा प्रकारे किती वेळा काडतुसे चोरली आणि ती कोणा विकली, याचा तपास खडकी पोलीस करत आहेत.
