साडेतीन लाखांचे दागिने लंपास, हडपसर पोलिसांनी काही तासांत केली भोंदू बाबाला अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : त्याच्या सांगण्यावरून पतीचे दारूचे व्यसन काही दिवस सुटल्यामुळे महिलेला त्याच्यावर विश्वास बसला होता. या विश्वासाचा गैरफायदा घेत, त्याने “घरावर संकट येणार आहे,” असे सांगून “मंगळसूत्र, दागिने, मुलीची चैन घेऊन या, मी या वस्तू मंतरून देतो, म्हणजे तुमच्यावरील संकट टळेल,” असे सांगितले. महिलेला हडपसर भाजी मंडईजवळ बोलावले आणि नजर चुकवून ३ लाख ४० हजार रुपयांचे दागिने घेऊन हा भोंदू बाबा पसार झाला. हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने काही तासांतच त्याला अटक केली आहे.
निलकंठ सूर्यवंशी (वय ३५, रा. कनेरसर, ता. खेड, सध्या रा. आळेफाटा, ता. जुन्नर) असे या भोंदू बाबाचे नाव आहे. याबाबत फुरसुंगी येथील एका ४४ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार २७ मार्च रोजी दुपारी दीड वाजता हडपसर येथील भाजी मंडईमधील मानकर डोसा शेजारील रसवंतीगृहाजवळ घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण दोन वर्षांपूर्वी फिर्यादी आपल्या पतीला घेऊन कनेरसर येथे गेल्या होत्या. यमाई देवी मंदिराजवळ त्यांची भेट निलकंठ सूर्यवंशी यांच्याशी झाली.
त्याच्या सांगण्यावरून फिर्यादीच्या पतीने काही दिवस दारू पिणे सोडले होते. त्यामुळे महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला. हा बाबा दर दोन-तीन महिन्यांनी फोन करून त्यांच्या कौटुंबिक समस्यांवर उपाय सांगत असे.
त्याबदल्यात त्या कधी कधी ५०० – १,००० रुपये दक्षिणा म्हणून पाठवत असत. २५ मार्च रोजी निलकंठ सूर्यवंशी याचा फोन आला. त्याने “तुमच्या घरावर संकट आहे,” असे सांगितले. त्यावर महिलेने उपाय विचारला असता, “मी भेटल्यावर सांगतो,” असे त्याने सांगितले.
२७ मार्च रोजी पुन्हा फोन करून त्याने “मंगळसूत्र, दागिने व मुलीची चैन घेऊन या, मी त्या वस्तू मंतरून देतो, म्हणजे संकट टळेल,” असे सांगितले. महिलेने त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून ३ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन हडपसर भाजी मंडईजवळ त्याला भेट दिली.
त्यांनी मानकर डोसाजवळील रसवंतीगृहात उसाचा रस पिला. त्यानंतर सूर्यवंशीने दागिने मागितले. महिलेने प्लास्टिकच्या पिशवीत भरलेले दागिने त्याच्या हातात दिले. तो पिशवीत हात घालून काहीतरी पुटपुटत होता.
यानंतर त्याने महिलेला एक लिंबू दिला आणि “थोडे पुढे जा, लिंबू खाली टाका, मग मी दागिने परत देतो,” असे सांगितले. त्या थोडे पुढे गेल्या, लिंबू खाली टाकला आणि मागे वळून पाहिले असता सूर्यवंशी तिथे नव्हता.
त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, पण तो पसार झाला होता. तो सोन्याचा नेकलेस, लक्ष्मीहार, मंगळसूत्र, सोन्याची चैन असा एकूण ६८ ग्रॅम वजनाचे ३ लाख ४० हजार रुपयांचे दागिने घेऊन फरार झाला.
महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण करून निलकंठ सूर्यवंशीचा माग काढला आणि त्याला अटक केली.
