प्रशिक्षणास भरघोस प्रतिसाद, अधिकारी व खासगी क्षेत्रातील प्रतिनिधींचा सहभाग
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : यशदाच्या ‘जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्रा’ मार्फत दि. २६ ते २८ मार्च या कालावधीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जमीन व्यवस्थापन विशेष प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र शासनाच्या ‘यशदा’ या सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेमध्ये गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या ‘जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्रा’ द्वारे हा उपक्रम राबविण्यात आला. शासन अधिकारी, कर्मचाऱ्यांसह खाजगी क्षेत्रातील व्यक्तींसाठीही हा प्रशिक्षण कार्यक्रम खुला ठेवण्यात आला होता.
या प्रशिक्षण कार्यक्रमात जमिनीचे अभिलेख, मोजणी तंत्रज्ञान, रिमोट सेंसिंग, डिजिटल अभिलेख व्यवस्थापन, नोंदणी प्रक्रिया, स्टॅम्प ड्युटी, जमिनीशी संबंधित कायदे व वाद सोडवण्याचे संस्थात्मक मार्ग या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
रियल इस्टेट कंपन्यांचे प्रतिनिधी, भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांचे अधिकारी, विधी व्यावसायिक, व्हॅल्यूयर्स आणि विद्यार्थी यांनी या प्रशिक्षणात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी यशदाचे महासंचालक निरंजन सुधान्शु यांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील जमिनीच्या डिजिटायजेशन उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विविध डेटाबेस इंटिग्रेशन हे भविष्यातील आधुनिक जमीन व्यवस्थापनाचे महत्त्वाचे घटक असतील, असे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षण सत्राचे संचालक शेखर गायकवाड यांनी जमिनींचा ऐतिहासिक संदर्भ, विविध न्यायालयीन प्रकरणे आणि जमिनीशी संबंधित महत्त्वाची माहिती या विषयांवर सखोल चर्चा केली.
या चर्चासत्रात निरंजन सुधान्शु, चोक्कलिंगम, शेखर गायकवाड, सरिता नरके, शाम खामकर, सुहास मापारी, श्रीकांत कुरुलकर, अविनाश पाटील, महेश सिंघल, प्रल्हाद कचरे, बाळासाहेब काळे यांनी विविध तांत्रिक आणि कायदेशीर बाबींसंदर्भात मार्गदर्शन केले.
‘जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्र’ हे केंद्र केंद्र सरकारच्या भूमी संसाधन विभागाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आले असून, त्याचा मुख्य उद्देश पश्चिम भारतातील राज्यांना जमीन व्यवस्थापन व कायद्यांबाबत मार्गदर्शन करणे हा आहे.
