प्रियकराच्या मदतीने केला खून, लोणी काळभोर पोलिसांनी काही तासात गुन्हा उघडकीस आणला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: अनैतिक संबंधात पतीचा अडथळा येत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
रवींद्र काशीनाथ काळभोर (वय ४५, रा. रायवाडी रोड, वडाळे वस्ती, लोणी काळभोर) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याच्या खुनाबद्दल पोलिसांनी शोभा रवींद्र काळभोर (वय ४२) आणि गोरख त्र्यंबक काळभोर (वय ४१) यांना अटक केली आहे.
रवींद्र काळभोर हे शेती करत होते. लोणी काळभोरमधील रायवाडी रोड येथील वडाळे वस्तीत एक जण जखमी अवस्थेत पडला असल्याचा कॉल १ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाला. लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी पोहचले. तेव्हा रवींद्र काळभोर यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून करण्यात आल्याचे दिसून आले.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिसांनी आजुबाजूच्या परिसरात चौकशी केली. तेव्हा रवींद्र काळभोर यांच्या पत्नी शोभा काळभोर हिचे गोरख काळभोर याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. गोरख काळभोर हाही शेती करतो.
त्यावरून लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्या अनैतिक संबंधात रवींद्र काळभोर हे बाधा निर्माण करत असल्याने दोघांनी संगनमत करून ३१ मार्च रोजी रात्री ११ वाजता रवींद्र काळभोर हे घराबाहेर झोपले असताना त्यांच्या डोक्यात हत्याराने वार करून त्यांचा खून केला.
गुन्ह्याचा प्रकार हा अतिशय गुंतागुंतीचा आणि क्लिष्ठ स्वरूपाचा असतानाही लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केली.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, सजेर्राव बोबडे, रत्नदिप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, पुजा माळी, पोलिस हवालदार देविकर शिंदे, वणवे, नागलोत, मेमाणे, पोलिस अंमलदार वीर, शिरगिरे, कडीर्ले, गाडे, कुंभार, सोनवणे, बनकर, जोजारे, धुमाळ, महिला पोलिस हवालदार नवले, होले, उषा थोरात यांनी केली आहे.
