१०८ देशांत विश्व नवकार मंत्र दिवस होणार साजरा
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : विश्वशांती आणि जगाच्या कल्याणासाठी येत्या ९ एप्रिल २०२५ रोजी विश्व नवकार मंत्र दिवस साजरा केला जाणार आहे. जगभरातील १०८ देशांत नवकार महामंत्राचा एकाचवेळी जप होणार असून या ऐतिहासिक कार्यक्रमास देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. जीतो च्या वतीने हा विश्व नवकार मंत्र दिवस साजरा करण्यात येत असल्याची माहिती जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांनी दिली.
जगभर अशांती व संघर्ष पाहायला मिळत आहे. अशा संघर्षाच्या काळात संपूर्ण विश्वात शांतता निर्माण व्हावी आणि विश्वाचे कल्याण व्हावे. जगाची नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल व्हावी आणि आपण सर्व मनुष्य शांती, सत्य व अहिंसेच्या मार्गावर चालावे यासाठी नवकार महामंत्राचा हा जप होणार आहे. पुरातन काळापासून यासाठी नवकार महामंत्राचा जप केला जातो.
नवकार महामंत्र ही शाश्वत प्रार्थना आहे. ही प्रार्थना विनम्रता, कृतज्ञता आणि भक्तीचे प्रतिक आहे. मानवतेसाठी हा मंत्र सर्वाधिक उपयुक्त असून यातून विश्वकल्याणाचा भाव प्रकट होतो. येत्या ९ एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त जगभरात १०८ देशांत नवकार महामंत्राचा जप होणार आहे.
विश्व कल्याणासाठी केल्या जाणाऱ्या या प्रार्थनेसाठी आपण सर्व जाती-धर्मातील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांनी केले आहे. विश्व कल्याणासाठी केल्या जाणाऱ्या नवकार महामंत्राला विशेष महत्त्व आहे.
या प्रार्थनेद्वारे अरिहंतों ना नमन केले जाते. या त्या विभूती आहेत ज्यांनी केवलज्ञान प्राप्त केले आहे. मोक्ष प्राप्त झालेल्या विभूती, साधू संत, गुरु, शिक्षक या महात्मांना याद्वारे नमन केले जाते. या नवकार महामंत्राच्या प्रार्थनेमुळे आपल्यामध्ये व आपल्या आजुबाजूला विश्वामध्ये सकारात्मकता वाढते, असे जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांनी सांगितले.
विश्व नवकार मंत्र दिवसानिमित्त 9 एप्रिल रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रार्थनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील लिंकवर जाऊन नावनोंदणी करावी. https://navkardivas.jitoworld.org/?City=Pune&ReferralCode=PuneChapter
“९ एप्रिल हा विश्व नवकार दिवस म्हणून जगभर साजरा होईल आणि त्या दिवशी सकाळी ७ ते ९.३० च्या दरम्यान जगभरात एकाचवेळी नवकार मंत्राचा जप होईल. दिल्लीतील विज्ञान भवन येथेही यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच धार्मिक गुरु, राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आदी अनेक क्षेत्रातील मान्यवर त्या त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. धर्म, जात, पंथ, राज्य, देश याच्या सीमा ओलांडून जगभरातील १०८ देशात या नवकार महामंत्राचा जप होणार आहे. यासाठी १०० हून अधिक अनुष्ठान असणार आहेत. तर, ६ हजारांहून अधिक ठिकाणांहून या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण होणार आहे.” – विजय भंडारी, प्रेसिडेंट जीतो अपेक्स
