महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रमजान ईद दिवशी सायंकाळी बिबवेवाडी पोलिसांनी बंदोबस्त दरम्यान एका युवकाला धारदार शस्त्रासह ताब्यात घेतले. पोलिस बंदोबस्तात असताना, एका व्यक्तीने आर वन फाईव्ह मोटारसायकलवरून वेगाने कट मारून पळ काढला.
बिबवेवाडी पोलिसांनी तत्काळ त्या दिशेला असलेल्या मार्शलला माहिती दिली. पोलिस कॉन्स्टेबल पवार आणि गायकवाड यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला अडवले. झडती घेतली असता, प्रकाश नवगिरे (वय 23, व्यवसाय: चालक, रा. सरगम चाळ, बिबवेवाडी, पुणे) याच्या कमरेला एक लोखंडी धारदार शस्त्र आढळले.
सदर व्यक्तीला गाडीसह ताब्यात घेण्यात आले असून, पंचनामा करून पुढील कारवाईसाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. या प्रकरणी आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे,पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले यांनी ही कारवाई केली असून, पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.
