फिरायला गेलेल्या नागरिकाला कारने धडक दिल्याने झाला मृत्यू
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या नागरिकाला धडक देऊन तेथून पळून गेलेल्या कारचालकाचा शोध घेऊन काळेपडळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
समीर गणेश कड (वय ३२, रा. गंगोत्री कॉम्प्लेक्स, होले वस्ती, उंड्री) असे या कारचालकाचे नाव आहे. त्याला आज सोरतापवाडी येथील दरडे गावातून ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत सुजितकुमार बसवंत प्रसाद सिंह (वय ४९, रा. बी फाईव्ह, विद्यानिकेतन, हांडेवाडी रोड, उंड्री) यांचा मृत्यु झाला होता.
सुजितकुमार बसवंत प्रसाद सिंह यांना व्यायामाची आवड होती. ते दररोज सकाळी धावण्यासाठी जात होते. त्याप्रमाणे ते मंगळवारीही सकाळी साडेसहा वाजता घरातून बाहेर पडले. न्याती इबोनी सोसायटीच्या सिमा भिंतीशेजारील मुख्य रस्त्यावरुन सिंह जात असताना भरधाव जाणाऱ्या कारने त्यांना धडक दिली.
या अपघातात त्यांचा जागीच मृत्यु झाला होता. अपघात झाल्यानंतर कारचालक तेथे न थांबता पळून गेला होता. अपघाताची माहिती मिळताच काळेपडळ पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे वाहनचालकाचा शोध सुरु केला.
पोलिसांना अपघात करणारी (nexon) कार असून ती करड्या रंगाची असल्याची माहिती मिळाली. परंतु, तिचा नंबरप्लेटवरील पूर्ण क्रमांक दिसून येत नव्हता. काळेपडळ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून या कारचा नंबर मिळविला. समीर कड याचा शोध सुरु केला.
काळेपडळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अतुल पंधरकर यांना समीर कड हे त्यांच्या शेतातील घरात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी पहाटे सोरतापवाडी येथील दरडे गावातील शेतामधील घरातून कड याला ताब्यात घेतले.
आपण कार घेऊन जात असताना बाजूने डंपर आला होता. ते अचानक समोर आल्याने त्यांना धडक बसली. लोक मारहाण करतील, म्हणून घाबरुन तेथे न थांबता पळून गेल्याने समीर कड याने पोलिसांना सांगितले.
