आयटी इंजिनिअरला जादा कमाईचे आमिष महागात पडले, मलेशियाच्या लिनाने केली फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: वेई वर्ल्ड डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या मलेशियातील लिना हिच्या सांगण्याला भुलून जास्त कमाईच्या आमिषाला बळी पडल्याने पुण्यातील एका आयटी इंजिनिअरने तब्बल २५ लाख रुपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत कोंढव्यात राहणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ८ ऑगस्ट २०२३ ते २१ डिसेंबर २०२३ दरम्यान घडला. दरम्यान, फिर्यादी तरुणाची नोकरी गेल्याने तो गावी निघून गेला होता. आता मलेशियाची ही लिना पुन्हा नवीन मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून युएसडीटी पाठविण्याबाबत वारंवार मेसेज करत असल्याने फिर्यादी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका आयटी कंपनीत नोकरीला होते. डेटिंग अॅपवर त्यांची मलेशियातील लिना नावाच्या तरुणीशी ओळख झाली. त्यांनी एकमेकांचे व्हॉट्सअॅप क्रमांक घेतले. लिनाने एके दिवशी आपण ऑनलाइन काही टास्क करून दररोज २० ते ३०० डॉलर्स इतकी रक्कम कमवते, असे सांगितले. यासाठी ती एका वेबसाईटवर टास्क पूर्ण करते आणि प्रत्येक टास्क पूर्ण केल्यावर कमिशन मिळते, असे सांगून तिने काही स्क्रीनशॉट फिर्यादीला पाठवले. त्यावर फिर्यादीचा विश्वास बसला.
तिने दिलेल्या वेबसाईटवर फिर्यादीने अकाऊंट तयार केले. त्यानंतर लिनाने तिचे अकाऊंट फिर्यादीच्या अकाऊंटला लिंक केले. त्यामुळे तिने केलेल्या टास्कचे कमिशनसुद्धा फिर्यादीला मिळेल, असे तिने सांगितले. काही दिवस लिना टास्क पूर्ण करत होती, आणि त्याचे कमिशन फिर्यादीला मिळत होते. काही दिवसांनी फिर्यादीला कळाले की लिनाला २०० ते ५०० डॉलर्स कमिशन मिळत आहे, तर त्याला फक्त २० ते ३० डॉलर्स मिळत आहेत. हा फरक का, असे विचारल्यावर लिनाने जास्त कमाईसाठी क्रिप्टोकरन्सी (युएसडीटी) भरावी लागेल, असे सांगितले.
त्याप्रमाणे फिर्यादीने क्रिप्टोकरन्सीसाठी पैसे भरले. त्याला “लकी ऑर्डर” प्राप्त झाली, ज्याची किंमत ४०० युएसडीटी होती. त्याने ही रक्कम वेबसाईटच्या वॉलेट अॅड्रेसमध्ये जमा केली. त्यानंतर त्याने ७ ते ८ टास्क केल्यानंतर १२०० युएसडीटीची लकी ऑर्डर मिळाली. इतकी मोठी लकी ऑर्डर कशी मिळाली, असे विचारल्यावर लिनाने सांगितले की ती दोन वर्षांपासून हे करत आहे आणि नवीन युजर असल्यामुळे त्याला जास्त लकी ऑर्डर मिळतात.
त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने ती रक्कम भरली. पुढे त्याच्याकडे ३ हजार युएसडीटीची लकी ऑर्डर आली. इतके पैसे नसल्याचे त्याने सांगितल्यावर लिनाने अर्धी रक्कम आपण भरणार असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी पैसे भरत गेला. मात्र, त्याने पैसे विड्रॉ करण्याचा प्रयत्न करताच त्याची रिक्वेस्ट रिजेक्ट झाली. टास्क पूर्ण न केल्यामुळे पैसे काढता येणार नाहीत, असे सांगण्यात आले.
यानंतर इन्कम टॅक्स भरावा लागेल, असे सांगून त्याला पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. त्याने कुठूनतरी पैसे जुळवून ते भरले. तरीही पैसे काढता आले नाहीत. शेवटी, पैसे भरण्यास उशीर झाल्याने आणखी २२०० युएसडीटी भरण्यास सांगण्यात आले. त्याच्याकडील सर्व पैसे संपल्याने त्याने मित्राकडे मदत मागितली. त्याला हा प्रकार सांगितल्यानंतर मित्राने हा संपूर्ण प्रकार फसवणूक असल्याचे सांगितले.
यानंतर फिर्यादीला संशय आला. तोपर्यंत त्याने २५ लाख रुपये गमावले होते. त्याने २१ डिसेंबर २०२३ रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर नोकरी गेल्यामुळे तो गावी गेला होता. आता परत आल्यानंतर त्याने अधिकृत फिर्याद दाखल केली आहे.
