आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

१०४ कामगारांची बनावट पीएफ खाती उघडून फसवणूक

Spread the love

यातील काही कामगारांना पीएफची खाती रद्द करण्यासाठी धमकावून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. ही खाती बनावट असल्याचे ऑगस्ट २०२४ मध्ये लक्षात आले. तसा अहवाल मिळाला, तरीही त्याबाबत तक्रार करण्यास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पोलिसांकडे तक्रार करण्यास तब्बल ८ महिने लागले.

याबाबत भविष्य निर्वाह निधी संघटनाचे इन्फोर्समेंट अधिकारी जयकिसन मोहनदास मनवानी (वय ४९, रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ डिसेंबर २०२० रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेबसाईटवर घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री गणेश इंटरप्राजयेस प्रो. प्रा. सिताराम ठकाणसिंग (रा. साठेवस्ती, सणसवाडी) यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी च्या वेबसाईटवर श्री गणेश इंटरप्रायेजस नावाने पीएफचा कोड रजिस्टेशन करण्यासाठी २३ डिसेंबर २०२० रोजी ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन केले. त्यांना संघटनेकडून कोड नंबर देण्यात आला. या कंपनीमध्ये २०२० ते २०२४ मध्ये १०४ कामगारांची पीएफ खाती ऑनलाईन उघडण्यात आलेली आहेत.

श्री गणेश इंटरप्रायजेस या अस्थापनामधील भारतामधील वेगवेगळ्या राज्यातील ११ कर्मचारी यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पत्राद्वारे, ईमेलद्वारे जून व जुलै २०२४ मध्ये तक्रारी केल्या. त्यात त्यांनी श्री गणेश इंटरप्रायजेस मध्ये त्यांनी कधीही काम केलेले नाही़ त्यांचे संमतीविना परस्पर त्यांचे नावे श्री गणेश इंटरप्रायजेस मध्ये पीएफची बनावट खाती उघडली आहेत.

त्यांना ही पीएफची खाती रद्द करण्यासाठी कोणीतरी व्हॉटसअप वरुन मेसेज पाठवून पैसे मागत आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत ४ कर्मचाऱ्यांनी ते रहात असलेल्या ठिकाणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या आहेत.

भविष्य निर्वाह निधीचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त यांनी श्री गणेश इंटरप्रायेज कंपनी व कंपनी मालकाचे व्हेरीफिकेशन करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश १८ व २४ जुलै २०२४ रोजी दिले होते. त्यानुसार जयकिशन मनवानी तसेच त्यांचे सहकारी डी एस तिलवणकर, प्रवर्तन अधिकारी अमोद देशपांडे हे ३१ जुलै २०२४ रोजी शिरुरमधील सणसवाडी येथील साठे वस्तीवर गेले.

तेथे जाऊन पडताळणी केल्यावर त्या पत्यावर श्री गणेश इंटरप्रायजेस नावाची कोणतीही संस्था आढळून आली नाही. तसेच तेथील परिसरातील नागरिकांकडे चौकशी केल्यावर त्या नावाची कोणतीही व्यक्ती तेथे राहत असल्याची माहिती मिळाली नाही.

सणसवाडी ग्रामपंचायतीत चौकशी केल्यावर तेथेही श्री गणेश इंटरप्रायजेस नावाची संस्था किंवा कंपनी मालक सिताराम ठकाणसिंग यांची नावे आढळून आली नाही. तसा अहवाल त्यांनी १ ऑगस्ट २०२४ रोजी कार्यालयाला दिला. त्यानंतर तब्बल ८ महिन्यांनंतर भविष्य निर्वाह कार्यालयाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

सिताराम ठकाणसिंग याने केवळ पीएफ खातीच बनावट काढली नाही तर शॉप अ‍ॅक्ट लायन्सनही बनावट काढले आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज कांबळे करीत आहेत.