पुणे, सोलापूर जिल्ह्यातील फसवणुकीचे २० गुन्हे विश्रामबाग पोलिसांनी आणले उघडकीस
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस असल्याचा बहाणा करून महिलांना गळ्यातील दागिने काढण्यास सांगून हातचलाखीने ते चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी कर्नाटकातील बिदर येथून पकडले. त्याच्याकडून पुणे व सोलापूर जिल्ह्यातील फसवणुकीचे २० गुन्हे उघडकीस आले आहेत.
जफर शहाजमान ईराणी (वय ४१, रा. लोणी काळभोर, पठारे वस्ती, सध्या रा. कृष्णानगर, व्हीटीसी जामिस्तानपूर, पो. वेटेरनरी युनिव्हर्सिटी कॅम्पस, जि. बिदर, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३ मोटारसायकली, ३२३ ग्रॅम सोन्याचे दागिने, १ लाख ३० हजार ४०० रुपये असा एकूण २९ लाख ६७ हजार ४५८ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
एक ज्येष्ठ महिला शनिवार पेठेतील न. वि. गाडगीळ जलतरण तलावाजवळून जात असताना, दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्याशी मराठीत बोलत, “मावशी, मी पोलीस आहे. तुमच्या इथे चोरी झाली आहे.
तुमच्या गळ्यातील गंठण व हातातील अंगठी काढून पिशवीत ठेवा,” असे सांगितले. फिर्यादीने विरोध केला असतानाही आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व हातातील अंगठी जबरदस्तीने हिसकावून नेली.
हा गुन्हा गेल्या वर्षी घडला होता आणि प्रलंबित होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे व पोलीस अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत हा गुन्हा सराईत गुन्हेगार जफर ईराणी यानेच केल्याचे निष्पन्न केले.
त्याला अटक करून अधिक चौकशी केली असता, त्याने पोलीस असल्याचे भासवून “तुमच्या गाडीवर गुन्हा घडलेला आहे” किंवा “ह्यासारखी मोटारसायकल मला खरेदी करायची आहे, एक राईट मारतो” अशा वेगवेगळ्या बहाण्यांनी मोटारसायकल चोरल्याचे समोर आले.
तो चोरलेल्या मोटारसायकलींच्या नंबर प्लेट बदलून मौल्यवान सोन्याचे दागिने मिळवत असे. तसेच, स्वतःला पोलीस असल्याचे सांगून पैसे मोजून घेत असताना हातचलाखीने पैसे लंपास करत असल्याचे तपासात उघड झाले.
जफर ईराणी याच्याकडून २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ३ मोटारसायकली, २५ लाख ७७ हजार ५८ रुपये किमतीचे ३२३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १ लाख ३० हजार ४०० रुपये रोख असा एकूण २९ लाख ६७ हजार ४५८ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पुणे व सोलापूर जिल्ह्यात त्याने एकूण २० फसवणुकीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, तसेच पोलीस अंमलदार अशोक माने, मयूर भोसले, सचिन कदम, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, शिवा गायकवाड, अनिस शेख, साताप्पा पाटील, संतोष शेरखाने, नितीन बाबर आणि सागर मोरे यांनी केली.
