आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अवैध बांधकाम करणाऱ्या बिल्डरला ठोकल्या बेड्या

Spread the love

पुणे : अवैध बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरुद्ध एकच फ्लॅट अनेकांना विकणे, मुदतीत फ्लॅटचा ताबा न देणे, दमदाटी करणे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत.

नवनाथ महादेव माने असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ माने याने मलिकनगर, साईबाबानगर, भाग्योदयनगर, मिठानगर, शिवनेरीनगर या भागात मोठ्या प्रमाणावर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अवैध बांधकामे केली आहेत.

त्याच्याविरुद्ध महापालिकेने अनेक वेळा गुन्हे दाखल केले आहेत. तरीही नवनाथ माने याने पुन्हा अवैध बांधकाम सुरू केल्याने पुणे महापालिकेचे अभियंता अमोल पुंडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला होता.

आरोपी नवनाथ माने याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

नवनाथ माने याने साईबाबानगर येथील इमारत पाडताना कोणत्याही प्रकारे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना केल्या नाहीत. तसेच कोंढवा भागात एकच फ्लॅट अनेक लोकांना विकणे, ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता दमदाटी करणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर करत आहेत.