समाजसेवा, युवा नेतृत्व आणि विविध संघटनांतील योगदानाची दखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सोलापूर जिल्हा बार्शी येथील उत्साही आणि समाजाभिमुख युवक शुभम उर्फ पवन श्रीश्रीमाळ यांची श्री. ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स (नवी दिल्ली) या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या महाराष्ट्र राज्य प्रांत मंत्रीपदी सन २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय युवा अध्यक्ष विपुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र राज्य प्रांतीय युवा अध्यक्ष हितेश कांकरिया यांच्या हस्ते देण्यात आले. श्रीश्रीमाळ यांना मिळालेले हे पद त्यांच्या समाजकार्य, युवकांमधील सक्रिय नेतृत्व आणि विविध स्तरांवरील कार्यगौरव यांच्या आधारावर देण्यात आले आहे.
पवन श्रीश्रीमाळ हे याआधी श्री. ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी कार्यरत होते. सध्या ते लायन्स लिओ क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेत मल्टिपल उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
तसेच, श्री नवकार जैन सेवा तीर्थ गोरक्षण, बार्शी येथे ट्रस्ट संचालक म्हणून कार्यरत असून, भारतीय जैन संघटनाच्या तालुका खजिनदार या पदावरही २०२० ते २०२२ दरम्यान प्रभावी कामगिरी बजावली आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याचा आवाका व्यापक असून त्यांनी श्री वर्धमान जैन स्थानक येथे सलग पाच वर्षे संचालक म्हणून कार्य केले आहे. याशिवाय, महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये पत्रकार असून, निर्भया महिला सुरक्षा पोलीस पथकात NGO प्रतिनिधी म्हणूनही ते सक्रीय आहेत.
या मानाच्या पदावर निवड झाल्याबद्दल शुभम उर्फ पवन श्रीश्रीमाळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
