महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रामनवमीचे पावन औचित्य साधून तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या “१०० दिवस ७ कलमी उपक्रम” अनुषंगाने, पुणे महानगरपालिका परिमंडळ क्र. ४ चे मा. उपआयुक्त व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात जनजागृती आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
ही विशेष मोहीम रविवार, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत ऐतिहासिक पेशवे तलाव व परिसरात राबविण्यात आली. पुणे महानगरपालिकेचे ब्रँड अँबेसिडर विक्रांत सिंह यांच्या पुढाकाराने तसेच VIIT कॉलेज – कोंढवा यांच्या सहकार्याने या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.
या उपक्रमात सुमारे २५० विद्यार्थी आणि ४० अधिकारी/कर्मचारी सहभागी झाले. मोहीमेदरम्यान १ कॉम्पॅक्टर आणि २ छोटा हत्ती वाहनांच्या साहाय्याने सुमारे २ टन १५० किलो कचरा संकलित करण्यात आला.
परिसरात स्वच्छतेसह नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात आली. उघड्यावर कचरा टाकणे, सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर, आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास विरोध यासारख्या बाबतीत विक्रांत सिंह व राजू दुल्लम यांनी मार्गदर्शन केले.
या मोहिमेदरम्यान महापालिका सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व सांगत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन घडवून आणले. त्यांनी अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमास कोंढवा-येवलेवाडी कार्यालयातील प्रशासन अधिकारी सुनील मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून, ती नागरिकांची दैनिक सवय व्हावी यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत. – लक्ष्मण कादबाने, सहाय्यक आयुक्त,
पुणे महानगरपालिका
