वर्षापूर्वी मित्राने केली होती भांडणे : पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आदित्य काकडे याचे मित्र असल्याच्या कारणावरुन टोळक्याने दोघांवर धारदार शस्त्राने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आंबेगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत यश कांबळे (वय २३, रा. ग्रीन हिल पार्क सोसायटी, कात्रज) आणि सार्थक ऊर्फ ओम पंडित (रा. अटल चाळ, कात्रज) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी ओंकार ढेबे, अनुज लोखंडे, अमन शेख, रामेश्वर जाधव, आदित्य शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत यश कांबळे याच्यावर भारती हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार करत असून हॉस्पिटलमधून त्याने आंबेगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा सोसायटी चहा सेल्समन म्हणून काम करतो.
आदित्य काकडे, साहिल काकडे (रा. अटल चाळ, कात्रज), सार्थक पंडित हे यश कांबळे याचे मित्र आहेत. एक वर्षापूर्वी आदित्य काकडे, साहिल काकडे यांचे पान टपरीवर आदित्य जालिंदर शिंदे याने जाऊन भांडणे केली होती. दोघांनी एकमेकांना मारहाण केली होती.
यश व सार्थक पंडित हे ५ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता दुचाकीवरुन कात्रजकडे जात होते. त्यावेळी अमन शेख, अनुज लोखंडे, ओंकार ढेबे व इतर जण मोटारसायकलवरुन आले. त्यांनी मोटारसायकल आडवी लावून त्यांना थांबविले.
ओंकार ढेबे याने “तुम्हाला लय मस्ती आली का, तुमचे मित्र आदित्य काकडे व साहिल काकडे यांनी आमचा मित्र आदित्य शिंदे याला मारहाण केली. आम्हाला आदित्य शिंदे व मोड्या यांनी तुम्हाला बघुन घ्यायचे सांगितले आहे.
आम्ही तुम्हाला आता जिवंत सोडत नसतो, असे म्हणून ढेबे याने यश कांबळे याच्यावर धारदार शस्त्राने हाताचे पंजावर, बोटावर, उजव्या खांद्यावर तसेच पाठीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करुन गंभीर जखमी केले.
तसेच अमन शेख, अनुज लोखंडे, रामेश्वर जाधव यांनी सार्थक पंडित याच्या डोक्यात, डोळ्यावर, खांद्यावर, पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे करीत आहेत.
