पेटंट मिळालेल्या संशोधनामुळे जिल्ह्याचा सन्मान वाढवला; भुम येथे सत्कार सोहळा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : भुम येथील रहिवासी आणि सध्या पुण्यातील व्हर्लपूल कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्रेयस सुनीलकुमार डुंगरवाल यांना त्यांच्या संशोधनासाठी भारत सरकारकडून पेटंट मंजूर झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते भुम येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुणे येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना, श्रेयस डुंगरवाल यांनी डुडल ॲपमधील प्रतिमा संग्रहणासाठी सुधारित प्रणाली (Systems for Storage Optimisation of Doodle Wave Application Image Database) या विषयावर संशोधन केले होते.
त्यांच्या या संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचा सत्कार करताना सांगितले, “ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन जागतिक पातळीवर नाव पोहोचवणं ही गौरवास्पद गोष्ट आहे.
श्रेयस यांनी धाराशिव जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.” या कार्यक्रमाला परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, तालुका प्रमुख अनिल शेंडगे, प्रल्हाद आडगळे, दिपक मुळे, ॲड. विनोद नाईकवाडी, विनोद जोगदंड, बाळासाहेब गुळमे आदी मान्यवर उपस्थित होते.
