विश्व नवकार मंत्र दिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिले नऊ संकल्प
महाराष्ट्र जैन वार्ता
नवी दिल्ली : नवकार मंत्रामध्ये संपूर्ण विश्वात सुख, शांती व समृद्धी निर्माण करण्यात ताकद आहे. विश्वशांती व विश्वकल्याणासाठी विश्व नवकार मंत्र दिवसाचे आयोजन करून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) ने खूप मोठं काम केले असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. यावेळी त्यांनी नऊ संकल्प सांगितले. या नऊ संकल्पामुळे नवीन ऊर्जा मिळेल, नवीन पिढीला दिशा मिळेल तर, जगभरातील समाजामध्ये शांतता नांदेल, असेही मोदी यांनी सांगितले.
जीतो अॅपेक्सच्या वतीने नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे ९ एप्रिल रोजी विश्व नवकार मंत्र दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जीतो अॅपेक्सचे चेअरमन पृथ्वीराज कोठारी, अध्यक्ष विजय भंडारी यांचे या कार्यक्रमाच्या उत्तम आयोजनाबद्दल मोदी यांनी अभिनंदन केले.
तसेच, हा कार्यक्रम भारताच्या एकतेचे प्रतिक असल्याचेही सांगितले. नवकार मंत्राचे महत्व सांगताना पंतप्रधान मोदी यांनी जैन धर्माची विविध गुणवैशिष्टेही सांगितली. याबरोबरच जैन धर्माच्या तत्वज्ञानाचा त्यांचा असलेला अभ्यासदेखील यावेळी दिसून आला.
त्यांनी यावेळी नऊ संकल्प करायला सांगितले. त्यामध्ये पाणी बचत करा, प्रत्येकाने एक झाड लावा व ते जगवा, स्वच्छता राखा, व्होकल फॉर लोकल, देश दर्शन करा, सेंद्रिय शेती करा, हेल्थी लाईफस्टाईल ठेवा, योग व खेळाला प्राधान्य द्या आणि गरीबांना मदत करा या नऊ संकल्पांचा समावेश आहे.
या नऊ संकल्पांमुळे तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल तर, नव्या पिढीला दिशा मिळेल आणि समाजात शांतता नांदेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदी म्हणाले की, नवकार मंत्र हा आपल्या आस्थेचे केंद्र आहे.
या मंत्रातील प्रत्येक अक्षर एक स्वतंत्र मंत्र आहें. हा मंत्र १०८ गुणांना नमन करतो. स्वतःवर विश्वास करा आणि स्वतःला प्रकाशित करा असा संदेश नवकार मंत्र देतो. तसेच, आपला शत्रू बाहेर नसून आपल्या आतच असून त्यावर विजय संपादन कराल तर, जीवन सुखी व समृद्ध होईल.
स्वतःला जर आपण जिंकले तर, आपण अरिहंत बनू. नवकार मंत्र हा जीवनाचा मार्ग आहे. तो शांतीचा रस्ता दाखवतो. तो सम्यक ज्ञान व सम्यक चरित्र असून मोक्षाकडे घेऊन जाणारा हा मंत्र आहे.
प्रगतीनंतरही आपण मूळ सोडत नाही हेच नवकार मंत्र सांगतो. विकसित भारत म्हणजे विकास आणि आपली संस्कृती या दोन्हींचा संगम आहे. विकसित भारताला संस्कृतीवर गर्व असेल. आपण विकासाच्या शिखरावर जाऊ पण आपली संस्कृती आपण कधीही विसरणार नाही.
नवीन भारत जगाला शांतीचा मार्ग दाखवेल. त्याचे उत्तर नवकार मंत्र आहे, अनेकांतवाद समजण्याची गरज सर्वाधिक आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताची जागतिक पातळीवर भूमिका निर्माण होण्यात जैन धर्मियांचे अनन्यसाधारण महत्व आहे.
त्यामुळेच संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीच्या स्थापत्यकलेत आपल्याला जैन धर्माची अनेक प्रतिके दिसतील. देशात केंद्र सरकारने ज्ञान भारत चळवळ उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यामध्ये पुरातन ग्रंथ व ज्ञानाचे संकलन केले जाणार आहे, असेही मोदी म्हणाले.
१ कोटी ८८ लाख लोकांनी केला जप : – विश्व नवकार मंत्र दिवसाच्या निमित्ताने जगभरातील १०८ देशांत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ठिकाणी एकाचवेळी झालेल्या या कार्यक्रमामध्ये 1 कोटी 88 लाख लोकांनी जप केला. एकट्या मुंबई शहरात ६०० ठिकाणी तर, संपूर्ण भारतात ९७७२ ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील अराजकता संपावी, आणि प्रत्येकामध्ये आत्मशांती निर्माण व्हावी हे या कार्यक्रमाचे उद्धीष्ट होते. ही आत्मशांती निर्माण झाली की, जगभर शांती व समृद्धता येऊ शकते, असे जीतो अॅपेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी यावेळी सांगितले. – विजय भंडारी प्रेसिडेंट जीतो अपेक्स
“नऊ संकल्पांनी मिळेल ऊर्जा, नव्या पिढीला दिशा” :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नागरिकांना नऊ संकल्प करायला सांगितले. यामध्ये पाणी बचत करा, प्रत्येकाने एक झाड लावा आणि ते जगवा, स्वच्छता राखा, व्होकल फॉर लोकल, देशदर्शन करा, सेंद्रिय शेती करा, निरोगी जीवनशैली अंगीकारा, योग आणि खेळाला प्राधान्य द्या आणि गरीबांना मदत करा या संकल्पांचा समावेश होता. या नऊ संकल्पांमुळे नागरिकांना नवीन ऊर्जा मिळेल, नव्या पिढीला योग्य दिशा मिळेल आणि समाजात शांतता नांदेल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
– पंतप्रधान मोदी
