धोनी, कोहली, अनंत अंबानी यांच्या डिपफेक व्हिडिओद्वारे लोकांची दिशाभूल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली तसेच उद्योगपती अनंत अंबानी यांच्या नावाने बनवलेले डिपफेक व्हिडिओ वापरून ‘एविएटर’ या ऑनलाईन गेमकडे लोकांना आकर्षित करण्यात येत आहे. या माध्यमातून पुण्यातील कोथरुड येथील एका तरुणाची तब्बल ३९ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित ३० वर्षीय तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुणा एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे. त्याला २८ नोव्हेंबर २०२४ रोजी एका गेमिंग प्लॅटफॉर्मबाबत मेसेज आला होता. त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्याने प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन केले.
सुरुवातीला त्याने ‘एविएटर’ या गेममध्ये १० हजार रुपये गुंतवले, पण परतावा न मिळाल्यामुळे त्याने पुन्हा १० हजार रुपये गुंतवले. २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२४ दरम्यान त्याने एकूण ५ लाख ८६ हजार रुपये गुंतवले. त्याला त्यातून १ लाख रुपयांचा परतावा मिळाला, ज्यामुळे त्याचा विश्वास वाढला.
यानंतर ५ ते ११ डिसेंबर दरम्यान त्याने ८ लाख ३० हजार रुपये, तर १२ ते १९ डिसेंबर या काळात १२ लाख ८३ हजार रुपये गुंतवले, त्यापैकी काही रक्कम परत आली. २० डिसेंबर ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत त्याने १२ लाख १३ हजार रुपये गुंतवले, मात्र यावेळी कोणताही परतावा मिळाला नाही.
परतावा थांबताच त्याने व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला. या प्रकारातून त्याची एकूण ३९ लाख ७७ हजार २९७ रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम कदम करीत आहेत.
