व्हॉट्सअॅप कॉल व व्हॉईस नोटद्वारे धमकी : कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोरेगाव पार्क येथे राहणाऱ्या एका उद्योजकाला पाकिस्तानमधून व्हॉट्सअॅप कॉल आणि व्हॉईस नोटद्वारे पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. याप्रकरणी अभिषेक भिमसेन कुलकर्णी (वय ३७, रा. द अँड्रेस, बोट क्लब रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी यांची अर्बीन एरोस्पेस ही एव्हिएशन क्षेत्रातील कंपनी असून, ती भारतासह दुबई, इंग्लंड आदी देशांमध्ये हेलिकॉप्टर व विमान विक्री आणि भाड्याने देण्याचा व्यवसाय करते.
२५ फेब्रुवारी रोजी रात्री ९.२४ वाजता त्यांच्या मोबाईलवर एक व्हॉट्सअॅप मेसेज आला. मेसेज पाठवलेला क्रमांक पाकिस्तानचा असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आलेला कॉल न उचलता दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांना एक व्हॉईस नोट प्राप्त झाली. त्यात धमकी देत असे म्हटले होते.
“अर्बीन जेट्स के मालिक हो ना, तुम अभिषेक, नया नया हेलिकॉप्टर खरीद रहे हो, हेलिकॉप्टर खरीदने के बाद कुछ जुर्माना दिया जाता है, पाच करोड रेडी रखना. दोन दिन में कॉल करता हूं. अगर रेडी नहीं रखा, तो देखना तुम्हारे साथ क्या होता है. पाच करोड रेडी रखना. इस बात को मजाक में मत लेना. तुम्हारी हिस्ट्री, जिओग्राफी, बायोग्राफी सब जानते हैं हम.”
सुरुवातीला कुलकर्णी यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, २८ फेब्रुवारी रोजी पुन्हा एक मेसेज व व्हॉईस नोट आली. त्यात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत गोळी मारण्याची धमकी दिली गेली. “दो-दो हेलिकॉप्टर लेने के लिए पैसे हैं, लेकिन हमें देने के लिए नहीं है,” असेही त्या व्हॉईस नोटमध्ये म्हटले गेले.
यानंतर १६ मार्च रोजी पुन्हा एक व्हॉईस नोटद्वारे पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, गुन्हे शाखेकडूनही कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
