नांदेड सिटी टाऊनशिपमधील घटना : सुरक्षा रक्षकांचे मनमानी वर्तन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नांदेड सिटी टाऊनशिपमधील मधुवंती सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर मंगळवारी (८ एप्रिल) सायंकाळी साडेचार वाजता एका रहिवाशाला फक्त गाडीवर सोसायटीचा स्टिकर नसल्यामुळे थांबवण्यात आले आणि त्यानंतर ८ ते १० सुरक्षा रक्षकांनी मिळून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.
या प्रकरणी प्रेरणा प्रफुल्ल सोनकवडे (वय ४२, रा. मधुवंती सोसायटी, नांदेड सिटी टाऊनशिप, नांदेड गाव) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सुरक्षा रक्षक नेवरकर व आश्विनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या गेल्या १० वर्षांपासून नांदेड सिटीमध्ये वास्तव्यास आहेत.
त्यांच्या पतींचा पुण्यात रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. मंगळवारी त्यांच्या गाडीवर सोसायटीचा स्टिकर नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना गेटवर थांबवले. त्यामुळे त्यांनी पत्नीला फोन करून रेसिडेन्सी कार्ड घेऊन यायला सांगितले. प्रेरणा सोनकवडे आपल्या मुलगा ओमकार (वय २२) याला घेऊन गेटवर गेल्या.
तेथे असलेल्या सुरक्षा रक्षक नेवरकर व आश्विनी यांनी अरेरावी करत वाद घालायला सुरुवात केली. यावेळी ओमकार व प्रेरणा यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला असता, नेवरकर यांनी प्रेरणा यांना धक्काबुक्की करून मारहाण केली.
त्यांना वाचवण्यासाठी ओमकार पुढे आल्यावर इतर सुरक्षा रक्षकांनी त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचप्रमाणे, प्रफुल्ल सोनकवडे यांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ओमकार यांच्या डोक्याला, तोंडास व इतर ठिकाणी गंभीर इजा झाली. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचारानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुढील तपास नांदेड सिटी पोलीस करत आहेत.
