शोभायात्रा, अहिंसा मोटरसायकल रॅली, रक्तदान व महाप्रसादाने सजला अध्यात्मिक व सेवाभावी उत्सव
महाराष्ट्र जैन वार्ता
बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : दि. १० एप्रिल २०२५ रोजी बार्शी (जि. सोलापूर) येथे भगवान महावीर स्वामी यांचा २६२४ वा जन्म कल्याणक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर आणि “जियो और जिनेंदो” व “अहिंसेचा संदेश” संपूर्ण जगाला देणारे भगवान महावीर यांच्या स्मरणार्थ, सकल जैन समाजाने एकत्र येऊन विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले.
श्री वर्धमान जैन स्थानकापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. फुलांनी आकर्षकरीत्या सजवलेली भगवान महावीरांची प्रतिमा रथात विराजमान करून ती शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत विविध जैन मंदिरांना भेट देत श्री ऋषभदेव जैन मंदिर, पेठ येथे विसर्जित करण्यात आली.
ज्या भागांत शोभायात्रा पोहोचली नाही, त्या शहरातील उर्वरित भागातून युवक-युवतींनी एकत्र येऊन “अहिंसा मोटरसायकल रॅली” काढून भगवान महावीरांचा अहिंसेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला.
भगवान महावीर स्वामींच्या जन्मोत्सव निमित्त स्व. पन्नालालजी मोहनलालजी श्रीश्रीमाळ यांच्या वतीने समाजबांधवांना पारंपरिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स युवा शाखा महाराष्ट्र आणि श्री वर्धमान नवयुवक मंडळ, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीच्या सहकार्याने एकूण ६१ बाटल्यांचे रक्त संकलन करण्यात आले.
या दिवसाचे औचित्य साधून वर्षभरासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये “जिवदया”, “जैन झुणका भाकर केंद्र”, “श्री वर्धमान तालुका वाचनालय”, “श्री महावीर धर्मार्थ दवाखाना”, तसेच “श्री नवकार जैन सेवातीर्थ गोरक्षण” अंतर्गत कत्तलखान्याकडे जाणाऱ्या तब्बल २५० भाकड गायींचे पालनपोषण करण्यात येणार आहे.
या प्रसंगी श्वेतांबर संप्रदायाचे परम पूज्य आचार्य कलापूर्णसुरीश्वरजी महाराज साहेब यांच्या संघातील साध्वी परमपूज्य कल्पज्ञा श्रीजी म.सा. आदी ठाणा पाच यांचे तसेच दिगंबर संप्रदायाचे पूज्य गुरु भगवंत श्री १०८ संकल्प सागरजी महाराज यांचेही शुभ सान्निध्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सकल संघाचे सुमतीलाल मुनोत, प्रदीप बागमार, धन्यकुमार शाह, जयचंद सुराणा, सुभाष लोढा, महेश बाफना, पवन श्रीश्रीमाळ, शैलेश वाखारिया, बाहुबली नगरकर, राजेंद्र येवनकर, दिलीप गांधी, राजेंद्र धारूरकर, महेंद्र धरमसी तसेच जैन समाजातील अनेक युवकांनी मेहनत घेऊन मोलाचे योगदान दिले.
