आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र जैन वार्ता
आळंदी : श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ आयोजित जैनांचे २४ वे तीर्थंकर श्रमण भगवान महावीर यांच्या २६२४व्या जन्मकल्याणक दिनानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे ओघवत्या वाणीतून, सुश्राव्य व अभ्यासपूर्ण व्याख्यान जैन स्थानक, आळंदी येथे संपन्न झाले.
ते म्हणाले की, “संघ म्हणजे संघटना, आणि त्याला पूर्वीपासूनच फार महत्त्व आहे. हा जैन संघ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आपल्या मेहनतीबरोबरच, महावीरांनी घालून दिलेल्या तत्त्वांवर चालणाऱ्या साधू-संतांच्या त्यागावर जैन समाज जगभर प्रगतीपथावर असल्याचे आपण पाहतो.
जैन साधू हे संपूर्ण देशभर धर्माचा प्रचार-प्रसार करीत असताना, अनवाणी पायी चालताना आपण पाहतो. हे जैन धर्मातील साधूंचं मोठं वैशिष्ट्य आहे. भगवान महावीर हेच या साधूंच्या रूपाने आज समाजप्रबोधन करत आहेत. जैन समाज संख्येने कमी असला, तरी श्रीमंतीबरोबरच दानधर्मातही अग्रेसर आहे.
आज कलियुगातही आपण जे काही चांगले होताना पाहतो, ते सर्व या साधू-संतांच्या त्याग व शिकवणुकीमुळेच शक्य झाले आहे. भगवान महावीरांसारखे महात्मे या साधू-संतांच्याच रूपाने पुन्हा पुन्हा अवतीर्ण होत असतात. संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे, ‘जे जे भेटीचे भूत! ते ते मानिजे भगवंत!!’ याची प्रचिती येथे येते.”
या प्रसंगी सुशील बहू मंडळाने भगवान महावीरांच्या जन्मावर आधारित नाटिका सादर केली. आनंद नवकार पाठशाळेतील मुलांनी जैन राष्ट्रगीत सादर केले. तसेच, जैन धर्मग्रंथावर आधारित गेम झोनच्या माध्यमातून स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाला आळंदी नगरपालिकेचे अभियंता सचिन गायकवाड, आळंदी जैन श्वेतांबर स्थानकवासी संघाचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, उपाध्यक्ष सतीश चोरडिया, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सरला लोढा, सुशील बहू मंडळाच्या अध्यक्षा भाग्यश्री चोरडिया, उपाध्यक्षा कल्पना रांका, आनंद नवकार पाठशाळेच्या तनुजा लुनावत, पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक आप्पा बागल, शहर भाजपा अध्यक्ष किरण येळवंडे, शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष आनंदा मुंगसे, मदनलाल बोरुंदिया, मोहनलाल चोपडा, संघाचे विश्वस्त राजेंद्र धोका, रमेश नवलाखा, राजेंद्र चोपडा, प्रमोद बाफना, राजेंद्र लोढा, सागर बागमार, श्याम कोलन, सचिन बोरुंदिया, दिलीप नहार यांच्यासह आळंदी पंचक्रोशीतील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निमित्ताने भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक आळंदी शहरातून सवाद्य, ताल-लयबद्ध घोषणांमध्ये आणि युवक-युवतींच्या गरबा नृत्याच्या उत्साहात पार पडली. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले आणि महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी वंदन केले.
आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, मच्छिंद्र शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरवणूक दरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमाची सांगता गौतम प्रसादीने झाली. सूत्रसंचालन श्रुती बोरूंदिया यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश वडगावकर यांनी मानले.
