राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या हस्ते सन्मान : सामाजिक बांधिलकीच्या कार्याची दखल
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करणाऱ्या ‘सीएसआर हिरोज अवॉर्ड २०२५’चा मान यंदा सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन व बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना मिळाला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या हस्ते मुंबई येथे आयोजित भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात ‘सूर्यदत्त’सह इतर नामवंत संस्थांचाही गौरव करण्यात आला. यावेळी मेघाश्रेय फाउंडेशनच्या संस्थापक विश्वस्त सीमा सिंग, बजाज फाउंडेशनचे शिशीर बजाज, नवभारत ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी आदी मान्यवर उपस्थित होते.
सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या विविध कंपन्या व सामाजिक संस्थांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. जेएसडब्ल्यू फाउंडेशन, सचिन तेंडुलकर फाउंडेशन, पीएनजी ज्वेलर्स, एल अँड टी ग्रुप, टाटा मोटर्स, एसबीआय फाउंडेशन, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, क्रॉम्प्टन अँड ग्रीव्ह्ज, ग्रांट मेडिकल फाउंडेशन इत्यादी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी जात, धर्म, आर्थिक परिस्थिती, भौगोलिक स्थिती आणि लिंगभेद याच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यावर आणि प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. या निस्वार्थी कार्याची दखल घेत त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
त्यांनी सुरू केलेल्या ‘कमवा आणि शिका’ या अभिनव उपक्रमांतर्गत २५०० हून अधिक काम करणाऱ्या व्यावसायिकांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली असून, त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यात मदत केली आहे.
प्रा. डॉ. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित शिक्षण, इंग्रजी व संगणक प्रशिक्षणाची सुविधा दिली जात आहे. महिला, कुली, रिक्षाचालक यांच्यासाठी विशेष प्रयत्न करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जात आहे.
ग्रामीण व आदिवासी भागातील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, वैद्यकीय शिबिरे, सामाजिक जनजागृती शिबिरे यांचे आयोजन करून सामाजिक विकासाला चालना दिली आहे.
फूडबँक, क्लोदिंग बँक, नॉलेज बँक, ब्लड बँक आणि स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन या उपक्रमांद्वारे त्यांनी समाजात मोठे योगदान दिले आहे.
समाजात परिवर्तन घडावे, सामाजिक उन्नती व्हावी आणि सर्व स्तरांतील लोकांचे शाश्वत पुनर्वसन व सक्षमीकरण व्हावे, या हेतूने प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे कार्य सातत्याने सुरू असून, या कार्याची पावती म्हणून त्यांना ‘सीएसआर हिरोज अवॉर्ड २०२५’ने गौरविण्यात आले आहे.
