हडपसर पोलिसांनी ४ लाख रुपयांचे ५१० शर्ट केले जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : यू.एस.पी.ए. (यू.एस. पोलो असो.) या ब्रँडेड कंपनीचे बनावट शर्ट विकणाऱ्या दुकानावर हडपसर पोलिसांनी छापा टाकून तेथून तब्बल ४ लाख ८ हजार रुपयांचे ५१० बनावट शर्ट जप्त केले आहेत.
याबाबत मंगेश जगन्नाथ देशमुख (वय ४५, रा. वारजे माळवाडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रीतम सुदाम गावडे (वय ३४, रा. साडेसतरानळी रोड, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश देशमुख हे यू.एस.पी.ए. ग्लोबल लायसेन्सिंग या कंपनीचे इन्व्हेस्टिगेशन अधिकारी आहेत. यू.एस. पोलो असो. या ट्रेडमार्क असलेल्या कंपनीचे बनावट शर्ट हडपसरमधील महादेवनगर येथील ‘रॉयल मेन्स कलेक्शन’ या दुकानात विकले जात असल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘रॉयल मेन्स कलेक्शन’ या दुकानावर छापा टाकला. तपासात ४ लाख ८ हजार रुपयांचे ५१० शर्ट बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सर्व शर्ट जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
