गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाची कारवाई : गुलटेकडीतील चौघा गुंडांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी कोंढव्यात आलेल्या चार तरुणांनी पहाटेच्या सुमारास परिसरात ९ वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने २४ तासांत चौघांना अटक केली आहे.
कोंढवा परिसरातील लक्ष्मीनगर येथे १६ एप्रिल रोजी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या काही युवकांनी परिसरात आरडाओरड करत शिवीगाळ केली आणि नंतर लक्ष्मीनगर लेन नं. ३ व आश्रफनगर गल्ली नं. ७ येथे पार्क केलेल्या ९ चारचाकी वाहनांची तोडफोड केली.
या तोडफोडीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी अविनाश शिवाजीराव देशमुख (वय २२, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नवाज अजीज शेख (वय २०), अल्फाज मुर्तजा बागवान (वय २०), यश विजय सारडा (वय १९) आणि अमन कबीर इनामदार (वय २०, सर्व रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांना अटक केली आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे सहायक पोलीस फौजदार राजस शेख आणि पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे यांना मिळालेल्या माहितीनुसार हे आरोपी गुलटेकडी परिसरातील आहेत. त्यानुसार डायस प्लॉट भागातून त्यांना अटक करण्यात आली.
चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, विनोद शिवले, तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, अकबर शेख, उमाकांत स्वामी, संजयकुमार दळवी, सुहास तांबेकर, पल्लवी मोरे आणि स्वाती तुपे यांनी केली आहे.
