१२ हजार कोटींच्या नवीन रस्त्याचा प्रस्ताव, रोजगाराची संधीही वाढणार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: पुणे महानगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरूर-खेड-कर्जत-पनवेल हा नवीन रस्ता प्रस्तावित केला आहे. या रस्त्याच्या कामासाठी १२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या संदर्भात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माहिती दिली. भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभागाची आढावा बैठक घेतली.
बैठकीदरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांचे वढु येथील समाधीस्थळ आणि तुळापूर येथील बलिदानस्थळ विकास आराखड्याचे चित्रफीतद्वारे सादरीकरण करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या पुनरुज्जीवनासाठी टप्प्याटप्प्याने काम सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या किल्ल्यांना रस्त्यांची जोडणी करण्यात येणार असून, पर्यटक तेथे अधिक काळ थांबतील, यासाठी पायाभूत सुविधा व आकर्षण केंद्रांची निर्मिती कशी करता येईल याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पर्यटन हा मोठा रोजगार देणारा उद्योग आहे आणि राज्यात या क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव आहे, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. त्यामुळे महत्त्वाची पर्यटनस्थळे मोठ्या रस्त्यांनी जोडणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बैठकीत मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, सोलापूर मंडळाचे एस. एस. माळी, सातारा मंडळाचे एस. बी. रोकडे, कोल्हापूर मंडळाचे तुषार बुरुड आणि दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्यासह विभागातील कार्यकारी अभियंते उपस्थित होते.
वाहतूक कोंडीला कायमचा उपाय
शिरूर-खेड-कर्जत-पनवेल या रस्त्यामुळे पुणे शहरासह शिक्रापूर-चाकण-तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी संपणार आहे. वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
हा प्रकल्प १२ हजार कोटी रुपयांचा असून ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर राबविला जाणार आहे. तसेच द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा भारही कमी होईल. हा प्रकल्प १३५ किलोमीटर लांबीचा असून, यामुळे अनेक फायदे होतील आणि गुंतवणूक वाढेल.
