आरोपीकडून २ गावठी पिस्टल, ४ जिवंत काडतुसे जप्त : ८१,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चालू असलेल्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत एक नामांकित, रेकॉर्डवरील गुन्हेगार अजिम ऊर्फ आंटया मोहम्मद हुसेन शेख (वय २५, रा. गल्ली नं. १२, कब्रस्तान समोर, सय्यदनगर, हडपसर, पुणे) याला अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे, असा एकूण ८१,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या आदेशानुसार तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नासीर देशमुख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी महंमदवाडी, पुणे येथील पालखी मार्गावरील गौरी हॉटेलजवळ संशयास्पद हालचाली करत असून त्याच्याकडे अग्निशस्त्र असल्याची दाट शक्यता आहे.
तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर पोलीस पथकाला दिलेल्या सूचनांनुसार तातडीने कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली.
आरोपी अजिम शेख पोलिसांना पाहून कावरेबावरे होत पळण्याचा प्रयत्न करताना आढळला. संपूर्ण पथकाने त्याला वेढा घालून ताब्यात घेतले. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्याच्याकडे २ गावठी पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसे मिळून आली. त्यानंतर काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ (अति. कार्य परिमंडळ ५, पुणे शहर) हिंमत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्या नेतृत्वाखाली प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, नासीर देशमुख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी आणि महादेव शिंदे या तपास पथकाच्या सशक्त सहकार्याने पार पडली.
