उपाध्यक्षपदी अरविंद जैन, नितीन न्याती, आदित्य जावडेकर, तेजराज पाटील यांची निवड
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुण्यातील खासगी बांधकाम व्यावसायिकांची अग्रगण्य संघटना क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी मनीष जैन यांची निवड करण्यात आली आहे. ते संस्थेच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष असून, त्यांचा कार्यकाळ २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी असणार आहे.
नवीन अध्यक्ष मनीष जैन म्हणाले, “ही जबाबदारी स्वीकारताना मला अत्यंत अभिमान वाटतो. पुण्याच्या बांधकाम क्षेत्राच्या शाश्वत आणि गतिमान विकासासाठी काम करण्यास मी उत्सुक आहे.”
त्यांनी विकासक, घर खरेदीदार आणि सर्व स्टेकहोल्डर्ससाठी नाविन्यपूर्णता, पारदर्शकता आणि सहयोगी प्रयत्नांवर भर दिला जाईल, असे आश्वासन दिले. जैन यांच्या नेतृत्वाखाली संघटना अनेक महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
यामध्ये पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या ५ किलोमीटर परिसरातील पर्यावरण मंजुरीच्या समस्या सोडवणे, पीएमआरडीएचा विकास आराखडा अंतिम करणे, प्रकल्पांसाठी योग्य पाणीवाटप आणि मीटरिंग सुनिश्चित करणे, तसेच उद्योग सुलभतेसाठी प्रक्रियेत सुधारणा करणे यांचा समावेश आहे.
बांधकाम क्षेत्रातील दर्जा, वेग आणि खर्च कार्यक्षमतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे. संघटनेच्या कार्यपद्धती आणि प्रणालींच्या सविस्तर रचनेवरही ते लक्ष केंद्रित करणार आहेत.
नवीन कार्यकारिणीची घोषणा – नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून अरविंद जैन, आदित्य जावडेकर, विनोद चंदवानी, आय. पी. इनामदार, नितीन न्याती आणि जे. पी. श्रॉफ यांचा समावेश आहे. अश्विन त्रिमल सचिवपदी, तर तेजराज पाटील आणि अखिल अगरवाल संयुक्त सचिवपदी नियुक्त झाले आहेत. कपिल गांधी यांची जनसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून, ते महाराष्ट्राचे माध्यम प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.
व्यवस्थापकीय समितीत यांचा समावेश – नवीन व्यवस्थापकीय समितीत संजय देशपांडे, मनीष कनेरिया, अनुप झमतानी, पुनित ओसवाल, केतन रुईकर, दिलीप मित्तल, रिंकू शेवानी, सिद्धार्थ मूर्ती, ईशान मगर, कपिल त्रिमल, सपना राठी, मिलिंद तलाठी, हिरेन परमार, आशिष जैन आणि भूषण पलशरे यांचा समावेश आहे.
