सकल जैन समाज आक्रमक : अधिकाऱ्यांच्या निलंबनाची आणि मंदिर पुनर्बांधणीची मागणी
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : मुंबईच्या विलेपार्ले (पूर्व) येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ जुने असून, ते न्यायालयीन स्थगिती आदेश असतानाही मुंबई महापालिका प्रशासनाने जमीनदोस्त केल्याने जैन समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यातील एच. एन. डी. जैन बोर्डिंग पुणे येथे सकल जैन समाजाने आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीत निषेध ठराव मंजूर करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार चिंचवड येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची आणि मंदिराची पुनर्बांधणी करण्याची मागणी करण्यात आली.
सकल जैन समाजाने स्पष्ट केले की, ही एखादी छोटी घटना वाटू शकते, मात्र ही जैन धर्मीयांसाठी मोठा इशारा ठरू शकते. न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून मंदिर पाडणे हे अत्यंत निषेधार्थ आहे.
जैन समाज शांतताप्रिय आहे, याचा गैरफायदा घेत सातत्याने त्यांना लक्ष्य केले जात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या घटनेमुळे केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशभरातील जैन समाज आणि इतर शांतताप्रिय नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अँड अभय छाजेड, अचल जैन, मिलिंद फडे, सुरेंद्र गांधी, चंद्रकांत पाटील, अजीत पाटील, अण्णासाहेब पाटील, अशोक पगारीया, राजेंद्र सुराणा, योगेश पांडे, शितल लोहाडे, उदय लेंगडे, प्रितम मेहता, सी.ए. सूर्यकांत शहा, मनीष बडजाते, अभय जैन, किरण शहा, पद्म अजमेरा, सुजाता शहा, महावीर शहा, सुनील कटारिया आदी जैन समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
