हांडेवाडीतील घटना : पत्नी आणि मित्रावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीचे अनैतिक संबंध आणि मित्राच्या त्रासाला कंटाळून रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने बहिणीला फोन करून सर्व प्रकार सांगितला होता. ह्या प्रकरणी हडपसर येथील काळेपडळ पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव सचिन सतिश गिरी (रा. सिद्धिविनायक विहार, हांडेवाडी रोड, हडपसर) असे आहे. याबाबत त्याची बहिण सविता संतोष भारती (वय ३९, रा. आदर्शनगर, उरळी देवाची) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कोमल सचिन गिरी (पत्नी) आणि रवींद्र मेमाणे (मित्र) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना १७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ ते सकाळी ११.१५ च्या दरम्यान सिद्धिविनायक विहार परिसरात घडली.पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन गिरी याने रवींद्र मेमाणे याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.
पैसे परत करत असूनही, सचिन घरी नसताना रवींद्र सातत्याने घरी येऊन पैसे मागत होता. या कारणावरून सचिन आणि रवींद्रमध्ये वाद होत होते. याचदरम्यान सचिनच्या पत्नी कोमलचे रवींद्रशी अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत असत.
सचिनच्या बहिणीने आणि आईने कोमलला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही फरक पडला नाही. १७ एप्रिल रोजी पहाटे १.१५ वाजता सचिनने बहिणीला फोन केला. त्यावेळी पत्नी कोमलही कॉन्फरन्स कॉलवर होती. “तिच्या चिठ्ठ्या माझ्याकडे आहेत,” असे सांगून कोमलने “घरी येऊन सांगते,” असे म्हणून फोन कट केला.
त्यानंतर सचिनने “कोमलच्या वागणुकीमुळे फाशी घेत आहे,” असे म्हणत बहिणीचा फोन बंद केला. फिर्यादीने लगेच कोमलला संपर्क साधला. त्यावर कोमलने “मरू दे, मला काही फरक पडत नाही,” असे उत्तर दिले.
सकाळी फिर्यादीने सचिनच्या आईला त्याच्या घरी पाठवले असता, घराचे दार आतून बंद होते. टेरेसवरून सचिनच्या मुलीने साडीच्या सहाय्याने खाली उतरून दरवाजा उघडला. आत पाहता, सचिनने बेडरूममधील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायत्री बैरागी करत आहेत.
