पिंपरीतील दुकानावर छापा टाकून पोलिसांनी केला ७ लाख ५९ हजारांचे बनावट माल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पिंपरी : पुमा से या कंपनीच्या बनावट ब्रँडच्या नावाने बनावट चप्पल व बुटांची विक्री करणाऱ्या पिंपरीतील दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी दुकानदारावर कॉपीराइट कायद्याखाली गुन्हा दाखल करून ७ लाख ५९ हजार रुपयांचे बनावट शूज व चप्पला जप्त केल्या आहेत.
याबाबत योगेश दशरथ मोरे (वय ४८, रा. गणजय सोसायटी, पारीजात कॉलनी, कोथरूड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुकानदार नितीन रमेश नथराणी (वय ३३, रा. सुखवानी सिटी, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुमा से ही जर्मन कंपनी असून तिचा ‘पुमा’ हा चप्पल व बुटांचा ब्रँड आहे. फिर्यादी हे पुमा से कंपनीचे तपासणी अधिकारी म्हणून काम करतात. पिंपरीतील दुकानात कंपनीच्या नावाने बनावट चप्पल व बुटांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय कापरे व पोलीस हवालदार शिंदे, पोलीस अंमलदार काकडे, विश्वासे, वाघमारे यांच्या पथकाने पिंपरी येथील दयाराम अँड सन्स या दुकानात छापा टाकला.
दुकानमालक नितीन नथराणी याने कंपनीच्या बनावट चप्पल व शूज काढून दिले.
दुकानातून एकूण ४५० चप्पल जोड, ६८ बुटांचे जोड, फॉप फ्लॉप २९ असे एकूण ५४७ जोड, अंदाजे ७ लाख ९० हजार रुपयांचे बनावट चप्पल व बुटे पोलिसांनी जप्त केले आहेत. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) धनंजय कापरे अधिक करीत आहेत.
