आवृत्ती पुणे
← Back to Homepage

साळुंखे विहारमध्ये एअरगनच्या फायरिंगने उडाली खळबळ

Spread the love

पुणे : साळुंखे विहार येथील एका घरावर गोळीबार झाल्याने घराच्या खिडक्यांच्या काचांवर छिद्रे पडल्याचे दिसून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, समोरील इमारतीमधून एअरगनने फायरिंग केल्याचे उघडकीस आले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून पोलिसांनी एकाला एअरगनसह ताब्यात घेतले आहे.

बिलाल जुल्फीकार शेख (वय २९, रा. रोषमा रेजन्सी, साळुंखे विहार) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला.

त्यात साळुंखे विहार येथे गोळीबार झाल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रऊफ शेख व गुन्हे शाखेचे पथक साळुंखे विहार येथे पोहोचले.

मनोज श्रीकांत कानडे (वय ५०, रा. शालिनी कॉटेज, साळुंखे विहार) यांच्या घरावर कोणीतरी पाच राऊंड फायर केल्याचे दिसून आले. कानडे यांच्या घराच्या खालील मजल्यावरील किचनच्या खिडकीवर एक खड्डा पडलेला आढळला, तसेच पहिल्या मजल्यावरील स्वयंपाकघराच्या खिडकीवर चार खड्डे पडल्याचे आढळले.

त्यांच्या घरात तुटलेल्या छऱ्याचे दोन तुकडेही सापडले. पडलेले खड्डे पाहून व त्यांची दिशा पाहता समोरच्या इमारतीमधून फायरिंग झाल्याचा पोलिसांना संशय आला. चौकशीदरम्यान समोरच्या इमारतीत जाऊन पाहणी केली असता, पहिल्या मजल्यावरील बिलाल शेख याने एअरगनमधून पाच छर्रे फायर केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी एअरगनसह बिलाल शेख याला ताब्यात घेऊन कोंढवा पोलीस ठाण्यात आणले असून, पुढील कारवाई सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सांगितले.