इनलाइन फ्रीस्टाईल स्केटिंगमध्ये जागतिक स्तरावर ठसा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुण्याच्या जिनेश नानल यांनी आपल्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीने महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले आहे. इनलाइन फ्रीस्टाईल स्केटिंग या क्रीडा प्रकारात त्यांनी सातत्यपूर्ण सराव व मेहनतीच्या जोरावर अभूतपूर्व यश संपादन केले असून, त्यांच्या या यशस्वी वाटचालीची दखल घेत त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२३-२४ ने सन्मानित करण्यात आले आहे.
पुण्याच्या जिनेश नानल यांनी इनलाइन फ्रीस्टाईल स्केटिंग या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्राचे व देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च व प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२३-२४ त्यांना प्रदान करण्यात आला.
गेल्या दहा वर्षांपासून प्रशिक्षक अशुतोष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सराव करत जिनेशने भारतीय स्केटिंग क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच हॉंगकॉंग येथे झालेल्या वर्ल्ड गेम्स सिरीज (११ ते १३ ऑक्टोबर २०२४) मध्ये त्यांनी एक रौप्य व एक कांस्य पदक पटकावले.
ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अधिपत्याखाली होणारी अत्यंत मानाची स्पर्धा आहे. याशिवाय, जिनेश यांनी चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून, देशांतर्गत स्तरावर सलग पाच वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवले आहे.
त्यांच्याकडे राष्ट्रीय विक्रमही नोंदवला गेला आहे. सध्या जिनेश भारतात प्रथम क्रमांकावर तर जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आहेत. जिनेश यांचे बालपण पुण्यातील एरंडवणे भागात गेले.
त्यांचे वडील सत्यन नानल आणि आई शीतल नानल हे दोघेही डॉक्टर असून, मागील २० वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच, जिनेश सामाजिक कार्यकर्ते विशाल खटोड यांचे भाचे आहेत.
खेळासोबतच जिनेश यांचा शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय सहभाग आहे. सध्या ते पुण्याच्या एमआयटी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असून, त्यांच्या क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी शिष्यवृत्ती देखील प्राप्त केली आहे.
प्रशिक्षक अशुतोष जगताप म्हणाले, “जिनेशचा यशस्वी प्रवास हा त्याच्या कठोर मेहनती, सातत्य व एकाग्रतेचा परिणाम आहे. तो युवा स्केटर्ससाठी एक आदर्श आहे. हा पुरस्कार संपूर्ण भारतीय स्केटिंग क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
हा पुरस्कार वितरण समारंभ १८ एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारी जिनेशची ही कहाणी स्पष्टपणे सांगते की – “जिथे कौशल्याला चिकाटीची साथ मिळते, तिथेच खरं यश जन्म घेतं.”
