बसवेश्वरांच्या विचारांचे आचरणच खरी सामाजिक क्रांती – किरण कोरे
हाडोंग्री येथे बसवप्रतिष्ठानतर्फे बसवेश्वर जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : बसवप्रतिष्ठान, हाडोंग्री यांच्या वतीने सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली.
या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून किरण कोरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांच्या विचारांना डोक्यात घेणे अधिक महत्त्वाचे आहे.” कोरे पुढे म्हणाले की, कोणत्याही महापुरुषाला त्यांच्या जातीपुरतं मर्यादित ठेऊ नये. त्यांच्या विचारांमध्येच आजारांवर उपाय आहेत आणि ते सर्व समाजासाठीच लागू होतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्धरण देताना त्यांनी नमूद केले, “जे लोक आपला इतिहास विसरतात, ते लोक इतिहास घडवू शकत नाहीत.” बसवेश्वर महाराज समतेचे खरे पुजारी होते. त्यांनी त्या काळात आंतरजातीय विवाह लावून जातिव्यवस्थेवर घाव घातला. त्यांचे पहिले कार्यक्षेत्र मंगळवेढा येथे सुरू झाले होते. बाराव्या शतकातच महिलांना ‘अनुभव मंडपात’ वाचनाचा अधिकार देणारे ते पहिलेच समाजसुधारक होते. त्यांनी कधीही जातपात मानली नाही.
या कार्यक्रमात पंचायत समितीचे माजी सदस्य मुक्ताप्पा तळेकर, भगवंत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अनिल तळेकर, उपसरपंच रवींद्र लोमटे, ओंकार पाटील, बिभीषण कदम यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी जयंती कमिटीचे अध्यक्ष प्रथमेश तळेकर, शुभम साखरे, पृथ्वीराज डोरले, गौरव तळेकर, समर्थ तळेकर, सिद्धांत तळेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
