स्वारगेट पोलिसांनी दोघांकडून १ लाख ८० हजार रुपयांचे १२ मोबाईल केले जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर येथील बसस्थानकावर होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपयांचे १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
तुषार अर्विता लोखंडे (वय २०, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) आणि गणेश संजय पोळके (वय २३, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
स्वारगेट पोलिसांचे पथक २८ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता गस्तीवर होते. दोघे जण पीएमपीच्या बसस्टॉपवर संशयास्पद पद्धतीने वारंवार फिरत असल्याचे दिसले.
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दोघांना हटकले. तेव्हा ते पळून जाऊ लागल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. तुषार लोखंडे याच्या सॅकची तपासणी केली असता त्यात ६ मोबाईल आढळून आले.
त्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे दोघांना पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. त्याच्याकडील ६ आणि इतर ६ असे एकूण १२ मोबाईल त्यांच्याकडे आढळून आले.
स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या मोबाईल चोरल्याचे त्यांनी सांगितले. या मोबाईलची तपासणी केल्यावर त्यातील एका मोबाईलबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे आढळून आले. पोलिसांनी १ लाख ८० हजार रुपयांचे १२ मोबाईल जप्त केले आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भारमळ, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, अशोक पाटील, पोलीस हवालदार अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, पोलीस अंमलदार ठोंबरे, कुडाळकर, प्रशांत टोणपे, सुजय पवार, दीपक खेंदाड, फिरोज शेख, हनुमंत दुधे, रमेश चव्हाण, संदीप घुले यांनी केली आहे.
