एक वर्षापासून जीवे मारण्याची धमकी देऊन देत होता त्रास : लष्कर पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कॅम्पमधील सेंटर स्ट्रीटवरील एका दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन गेल्या वर्षभरात एक गुंड हप्ता वसूल करत होता. लष्कर पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे. अरबाज कुरेशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी ओमप्रकाश बोमाराम चौधरी (वय ३५, रा. महादेव ट्रेडर्स, सेंटर स्ट्रीट, कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात चौधरी यांचे दुकान आहे. आरोपी कुरेशीने त्यांना दरमहा हप्ता देण्याची मागणी करत धमकावले होते.
“या भागात व्यवसाय करायचा असेल तर दरमहा हप्ता द्यावा लागेल. दुकान चालवायचे असेल, पैसा देना पडेगा, नहीं तो तुमको मार डालूंगा,” अशी धमकी तो चौधरी यांना देत होता. त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी त्यांच्याकडून १५,८०० रुपये जबरदस्तीने घेतले होते.
त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर चौधरी यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली. लष्कर पोलिसांनी अरबाज कुरेशी याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तरटे करत आहेत.
