दोन लाखांचे ६ मोबाईल, दुचाकी भारती विद्यापीठ पोलिसांनी केली जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : फोनवर बोलत असणाऱ्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्याकडील मोबाईल चोरून नेणाऱ्या दोघांपैकी एका चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून १ लाख ९० हजार रुपयांचे ६ मोबाईल आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
रोहित सुरेश कांबळे (वय १८, रा. जाधवनगर, गुजरवाडी फाटा, कात्रज) असे या चोरट्याचे नाव आहे. गुजरवाडी फाटा येथील महेश कदम यांच्या बंगल्याजवळील गोल्डन स्क्रॅप सेंटर या दुकानासमोरील रस्त्याच्या कडेला १ मे रोजी रात्री दहा वाजता फिर्यादी फोनवर बोलत होते.
त्यावेळी दुचाकीवरून दोघे जण आले. त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. या गुन्ह्याचा तपास भारती विद्यापीठ पोलीस करत होते. पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे यांना हा गुन्हा गुजरवाडी येथील रोहित कांबळे व सलमान शेख यांनी केल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी रोहित कांबळे याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात १ लाख रुपयांची दुचाकी आणि ९० हजार रुपयांचे ६ मोबाईल जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मोबाईल व दुचाकीच्या मालकांचा पोलीस शोध घेत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली आहे.
