महाराष्ट्र जैन वार्ता
आढळगाव: येथील जैन समाजासाठी अभिमानास्पद ठरणाऱ्या वर्धमान जैन स्थानक भवन या भव्य इमारतीचे उद्घाटन शनिवार, ३ मे रोजी पार पडले. अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर प.पू. श्री प्रवीणऋषिजी म.सा. यांच्या प्रेरणेने आणि अहिल्यानगर येथील अर्हम कल्याणमित्र ग्रुप यांच्या माध्यमातून या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम जैन विधीप्रमाणे अत्यंत भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सकाळी ९ वाजता अर्हम स्थापना विधीने प्रारंभ होऊन आढळगाव येथील सर्व जैन कुटुंबांनी सहभागी होत विधी पार पाडला.
या भव्य इमारतीस “शेठ शंकरलाल सागरमलजी गांधी वर्धमान जैन स्थानक आढळगाव” असे नाव देण्यात आले असून, महासतीजी प.पू. श्री सुनंदाजी म.सा. आदी ठाणा ६ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्थानकाची उभारणी झाली आहे.
स्थानक उभारणीसाठी आढळगाव येथील गांधी, मुनोत, गुगळे इत्यादी कुटुंबांतील सदस्यांनी आपले अमूल्य योगदान दिले. या उद्घाटन कार्यक्रमाला गावातील तसेच पुणे, नगर आणि अन्य ठिकाणाहून आलेल्या जैन बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमानंतर आढळगाव श्रावक संघाच्या वतीने सर्वांसाठी गौतमप्रसादीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रावक संघातील सर्व जेष्ठ सदस्य, भगिनी, तसेच युवक-युवतींनी परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती सुरेंद्र गांधी आणि विजय मुनोत यांनी दिली.
