प्रथम काही प्रमाणात नफा देऊन विश्वास संपादन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर ट्रेडिंग कंपनीचे ब्रोकर असल्याचे सांगून ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास लावून, मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे शेअर्स विकत घेण्यास सांगून, सुरुवातीला काही प्रमाणात नफा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. वेगवेगळ्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून २५ लाख ९५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोहगावमधील साठे वस्ती परिसरात राहतात. २८ मार्च रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी एक लिंक पाठवून मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे शेअर्स विकत घेण्यास सांगितले.
त्याबदल्यात, सुरुवातीला सायबर चोरट्यांनी काही प्रमाणात नफा ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या खात्यात वर्ग केला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसल्याने फिर्यादीने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.
अवघ्या १८ दिवसांत फिर्यादीने तब्बल २६ लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतरही सायबर चोरट्यांनी त्यांना आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र, संशय आल्यामुळे त्यांनी गुंतवणुकीचा परतावा मागितला.
त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आशालता खापरे करत आहेत.
