प्रशासकीय सुधारणा व नवतंत्रज्ञानाच्या वापरावर भर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाने सुरू केलेल्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा अभियानांतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक करावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या बैठकीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा समावेश होता. सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य विभागाने आंबेगाव, भोर आणि जुन्नर तालुक्यांतील रिक्त पदांवर भरती तातडीने करावी. तसेच, राज्य शासनाच्या सर्व योजनांची १०० टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या बैठकीदरम्यान महावितरण, महापारेषण, विद्युत निरीक्षक व इतर संबंधित विभागांनी त्यांच्या योजनांची सद्यस्थिती व अंमलबजावणीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
प्रत्येक विभागाने आपले संकेतस्थळ अद्ययावत ठेवावे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या अडचणीचे तातडीने निराकरण व्हावे. त्यांनी घनकचरा आणि प्लास्टिक व्यवस्थापनासाठी लोकचळवळीचे महत्त्व अधोरेखित करत गावपातळीवर सरपंच, स्थानिक प्रतिनिधी आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने जनजागृती उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले.लिंग निवडीच्या प्रकारांवर कडक कारवाई करावी आणि सोनोग्राफी केंद्रांवर लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. अंगणवाड्यांमध्ये १०० टक्के परसबाग विकसित करण्यासाठी पावले उचलावीत, असे निर्देशही त्यांनी दिले. – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
