साडेचारशे एकरात उभारला जाणार 701 कोटींचा भव्य प्रकल्प
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : प्राचीन भागवत धर्मातील सनातन व कल्याणकारी विचार संपूर्ण जगभर पोहोचवण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेवर भव्य ‘संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे ज्ञानपीठ जगाला हेवा वाटावा असे भव्य असेल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदी येथे आयोजित संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात बोलत होते. 701 कोटींचा आराखडा तयार, ज्ञानपीठातून भारतीय विचारांचा जागतिक प्रसार “हे ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे ही ईश्वराची योजना असावी, आणि त्याचे समाधानही असावे.”
“या प्रकल्पासाठी 701 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचे शाश्वत विचार याच माध्यमातून जगभर पोहोचवले जातील.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचाही उल्लेख केला.
“हा आराखडा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून लवकरच मंजूर होईल. याद्वारे 39 गावांतील सांडपाणी आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पाणी शुद्ध करून नदीत सोडले जाईल.
यामुळे इंद्रायणीचे पाणी स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय होईल,” असे त्यांनी सांगितले. ह. भ. प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर यांनी भागवत धर्माच्या प्रचारासाठी केलेल्या कार्याची दखल घेतली.
“त्यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल.” “आजच्या सोहळ्यात वारकऱ्यांच्या रूपातील पांडुरंगाचे दर्शन झाले.” “परकीय आक्रमणाच्या काळात भागवत धर्म टिकवण्याचे कार्य संत आणि वारकरी संप्रदायाने केले. त्यामुळे आपल्या विचारसरणी, संस्कृती आणि धर्माला कोणीही नष्ट करू शकले नाही.”
