बीड, नाशिक, शिर्डी सह अनेक ठिकाणी आरटीओचा लोगो व गणवेश वापरून वाहन अडवून केली फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बीड – पवन श्रीश्रीमाळ : बीड शहरालगतच्या बायपास रोडवर बनावट आरटीओ अधिकाऱ्याची बतावणी करून वाहनधारकांकडून पैसे वसूल करणाऱ्या टोळीचा बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून वाहन, मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे ११ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे अजय बालाजी गाडगे (रा. अमृतनगर, घाटकोपर, मुंबई) व दिनेश मंगल धनसर (रा. कलीना, मुंबई) हे असून, ते आरटीओ अधिकाऱ्याचा गणवेश घालून आणि बनावट लोगो लावलेल्या जीपमधून वाहनधारकांना अडवत होते.
बीड आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांना बीड बायपास रोडवर एक जीप उभी असल्याची माहिती मिळाली. ती जीप तपासली असता, आरटीओचा लोगो व इमर्जन्सी दिवा लावलेली होती.
वाहनात दोन संशयित बसले होते. चौकशीदरम्यान त्यांनी आरटीओ अधिकारी असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या ओळखीबाबत शंका आल्याने सखोल तपास सुरू केला.
यावेळी धनसरने पोलिसांना धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला पाठलाग करून पकडण्यात आले.
त्यावेळी उघड झाले की, हे दोघेही बनावट ओळख सांगून लूट करत होते. त्यांनी सांगितले की त्यांनी मलाड येथून पांढरी जीप विकत घेऊन ती हुबेहूब आरटीओ वाहनासारखी बनवली होती. बीड, नाशिक, शिर्डी, अहिल्यानगरसह विविध ठिकाणी त्यांनी बनावट आरटीओ म्हणून वाहनधारकांकडून रोख व ऑनलाईन स्वरूपात पैसे उकळले होते.
या कारवाईत पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने तसेच एलसीबीचे कर्मचारी पोहेकॉ मनोज वाघ, कैलास ठोंबरे, पोना विकास वाघमारे व चालक शिवाजी खवतड यांचा मोलाचा सहभाग होता.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट आरटीओ बनून लुटमार करणाऱ्या टोळीचा छडा लागल्याने वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
