हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात रक्तदान व डोळे तपासणी शिबिर संपन्न
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सद्यस्थितीत देशात उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्तसंकलनाची मोहीम आवश्यक असून, रक्तदान ही एक व्यापक चळवळ व्हायला हवी, असे मत पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष राजेश शहा यांनी व्यक्त केले.
श्री पूना गुजराती बंधू समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ आणि धी पूना गुजराती केळवणी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, पुण्यातील हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात नुकतेच रक्तदान व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष राजेश शहा आणि पूना हॉस्पिटल मॅनेजमेंटचे ट्रस्टी सुजयभाई शहा यांच्या हस्ते झाले. समाजातर्फे वर्षभर घेण्यात येणाऱ्या विविध रक्तदान शिबिरांमधून आतापर्यंत सुमारे १००० रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्यात आले असून, पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या ‘राकेश जैन ब्लड बँक’ने यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
याशिवाय, देसाई हॉस्पिटलच्या माध्यमातून डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली व गरजूंना मोफत चष्मेही वाटण्यात आले. या उपक्रमात नैनेश नंदू, राजेंद्र शहा, हरेश शहा, हेमंत मणियार, विनोद दोडिया, संदीप शहा, हेमंत मेहता, संजय मेहता, केतन कापडिया, दीपक मेहता, पंकज दोडिया आणि कृती नागरेचा यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आयोजन हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने शारीरिक शिक्षण संचालक डॉ. ऋषी दुबे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विकास मुळे, प्रशासकीय अधिकारी संदीप देशपांडे यांनी विशेष मेहनत घेतली.
महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागातील विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून इतरांना देखील प्रेरित केले. शिबिराची सुरुवात डॉ. ऋषी दुबे व संदीप देशपांडे यांच्या रक्तदानाने झाली.
या शिबिरात एकूण ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर सुमारे २५४ नागरिकांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली. त्यापैकी जवळपास १०० जणांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले. तसेच, अनेक गरजूंना डोळ्यांवरील अत्यावश्यक शस्त्रक्रिया मोफत करून घेण्याची संधी मिळाली.
सद्याची युद्धमय परिस्थिती पाहता, आतापासूनच देशभरातून मोठ्या प्रमाणात रक्तसंकलनाची व्यापक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. तसेच, एच. व्ही. देसाई डोळ्यांचे हॉस्पिटलद्वारे आजवर हजारो नागरिकांवर मोतीबिंदू, काचबिंदू अशा अत्यावश्यक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत, आणि हे कार्य अविरतपणे सुरूच राहणार आहे. – राजेश शहा
