एपीआयसह चार पोलीस निलंबित, सांगली कारागृहात नेताना वाटेत शॉर्प शुटरची भेट घडवली
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कुख्यात गँगस्टर गजा मारणे याला सांगली कारागृहात नेत असताना, वाटेत त्याच्या साथीदाराच्या ढाब्यावर थांबवून मटण पार्टी घेऊ देणे, तसेच शॉर्प शुटर साथीदारांची भेट घडवून देणे, हे प्रकरण सहायक पोलीस निरीक्षकासह चौघा पोलिसांना भोवले आहे. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या चौघांना निलंबित केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक सुरजकुमार यलप्पा राजगुरु, पोलीस हवालदार महेश लक्ष्मण बामगुडे, सचिन लक्ष्मण मेमाणे, रमेश ताऊजी मेमाणे व पोलीस अंमलदार राहुल मनोहर परदेशी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. हे सर्व जण गुन्हे शाखेत कार्यरत होते.
कोथरुड येथे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेसह त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
गजा मारणे याला येरवडा कारागृहाऐवजी सांगली कारागृहात ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्याअनुसार गजा मारणे याला सांगली कारागृहात नेत असताना, त्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी सुरजकुमार राजगुरु यांच्यासह अन्य चौघांवर सोपविण्यात आली होती.
मात्र, गजा मारणे याला कधी, कुठून नेत आहेत, तसेच वाटेत जेवणासाठी कोठे थांबणार, याची माहिती त्याच्या साथीदारांना आधीच देण्यात आली होती. पुण्यातून निघाल्यानंतर गजा मारणे याचे साथीदार ‘थार’ गाडीतून आणि चार अन्य वाहनांतून पाठलाग करत होते.
साताऱ्यातील मारणे टोळीशी संबंधित कणसे ढाब्यावर गजा मारणे याला थांबवण्यात आले. तेथे पुणे, सातारा, सांगली येथील त्याचे साथीदार त्याला भेटले आणि त्याला मटणाची प्लेट देण्यात आली.
ही बाब पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना समजल्यावर त्यांनी चौकशीचे आदेश दिले. कणसे ढाबा तसेच वाटेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची पाहणी करण्यात आली. त्यातून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
गजा मारणे याला नेताना विशेष वागणूक देऊ नये, अशा सूचना आधीच देण्यात आल्या होत्या. तरीसुद्धा त्याच्या टोळीतील सदस्यांना माहिती देऊन त्याला भेटू दिले गेले. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळून जाण्याची शक्यता, कोठडीत मृत्यू होणे यांसारख्या घटनांबाबत जारी केलेल्या परिपत्रकांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
मारणे टोळीचा गुन्हेगारी इतिहास माहिती असूनही त्याच्याशी संबंधित व्यक्तींना ढाब्यावर व सांगली कारागृहात भेटू देण्यात आले. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली असून, यासाठी संबंधित चौघांना निलंबित करण्यात आले, असे आदेश सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले आहेत.
ढाब्यावर भेटले शॉर्प शुटर –
कणसे ढाब्यावर पुणे, सातारा व सांगली येथील गजा मारणे टोळीतील गुन्हेगार त्याला भेटले. त्यापैकी तिघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावरही आता नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ व बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते हे त्याला भेटले. पांड्या मोहिते हा सांगलीतील त्याचा शॉर्प शुटर आहे, तर विशाल धुमाळवर खुनाचा गुन्हा दाखल आहे.
