बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपीला शिताफीने अटक करून न्यायालयात केले हजर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणात तब्बल २७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अखेर बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक करत मोठे यश मिळवले आहे.
गुन्हा क्रमांक १७/१९९७, भारतीय दंड विधान कलम ३०२, ३०४(२) अन्वये दाखल असलेल्या खटल्यातील आरोपी विनायक साहेबराव फुरडे (रा. कांदलगाव, सध्या रा. ढाकेवाडी, कसबापेठ, बार्शी) याला मा. जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर यांनी ५ वर्षांची सक्तमजुरी व रु. २०००/- दंड (दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास) अशी शिक्षा ठोठावली होती.
सदर शिक्षेविरोधात आरोपीने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे फौजदारी अपील क्रमांक २४२/१९९८ दाखल केले होते. त्यानुसार आरोपीला जामीन मंजूर झाला, मात्र तो न्यायालयात हजर न राहता मुंबई व ठाणे परिसरात राहू लागला. यानंतर आरोपी फरार झाला होता.
या पार्श्वभूमीवर मा. अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालय, बार्शी यांनी त्याच्यावर अटक वॉरंट जारी करून पोलिसांना त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले होते. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची दिशा आखली. यामध्ये पोलीस अंमलदार प्रल्हाद अकुलवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. १३ मे २०२५ रोजी आरोपी विनायक फुरडे हा कांदलगाव येथे असल्याचे समजले.
तत्काळ कारवाई करत गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत शिताफीने त्यास अटक केली व न्यायालयात हजर केले. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सहाय्यक पोलीस फौजदार अजित वरपे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब घाडगे, श्रीमंत खराडे, पोलीस नाईक अमोल माने, संगप्पा मुळे, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश जाधव, धनराज फत्तेपुरे, राहुल उदार, सचिन नितनात, अवि पवार, प्रल्हाद अकुलवार, सचिन देशमुख आणि इसामियाँ बहिरे यांनी एकत्रितपणे बजावली. या कार्यवाहीमुळे गुन्हेगारीविरुद्ध पोलिसांची कार्यकुशलता, धाडस आणि सजगता अधोरेखित झाली आहे.
