१०३ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा, चरस जप्त डीआरआयची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बँकॉकहून आलेल्या दोन प्रवाशांकडून तसेच मुंबईतील त्यांच्या वितरकाकडून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे युनिटने १० कोटी ३० लाख रुपयांचा चरस आणि हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय तस्करी उघडकीस आणून तिघांना अटक केली आहे.
महसुल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे युनिटला माहिती मिळाली होती. त्यावरुन १२ मे रोजी बँकॉकहून आलेल्या दोघा प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. त्यांच्या सामानात ११ हवाबंद पाऊच मिळून आले.
या पाऊचची तपासणी केली. तेव्हा त्यात ९८६४ ग्रॅम हिरवा गांजा (हायड्रोपोनिक वीड) मिळून आले. हे दोघेही मुंबईचे राहणारे आहेत. त्यांना अटक करुन केलेल्या चौकशीत त्यांच्या वितरकाची माहिती मिळाली.
डीआरआय अधिकार्यांनी संशयित वितरकाला ताब्यात घेऊन त्याच्या मुंबईतील घराची झडती घेतली. त्यात त्याच्याकडे ४७८ ग्रॅम चरस आणि गांजा मिळाला. डीआरआयने त्या तिघांकडून एकूण १० किलो ३०० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले असून त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात १० कोटी ३० लाख रुपये किंमत आहे.
तिघांवर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
